Vaijapur Taluka Heavy Rain
नितीन थोरात
वैजापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. सोयाबीन, मका ही पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत, तर उसाचे पीक आडवे पडून शेतकरी हवालदिल झाले आहेत. कर्ज काढून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे सर्व स्वप्न चिखलात गेले आहे. 'पुढारी न्यूज'ने देखील काल शेतकऱ्यांचा आक्रोश व परिस्थिती दाखवली होती. पिके वाहून गेल्याची, शेतात पाणी साचल्याची आणि शेतकरी रडत उभा असल्याची हृदयद्रावक दृश्ये कॅमेऱ्यात बंदिस्त झाली. त्याच बातमीच्या पार्श्वभूमीवर आज खासदार संदीपान भुमरे आणि शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शिवाराची पाहणी केली.
या वेळी खासदार आणि आमदारांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
“पेरलेले उगवत नाही, उगवलेले नष्ट होते,” अशी स्थिती झाल्याने शेतकरी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची वेदना व्यक्त करत आहेत. दिवसरात्र कष्ट करून उभे केलेले पीक पाण्याखाली जाताना पाहून शेतकरी डोळ्यात पाणी आणून शासनाकडे मदतीची आस लावून बसले आहेत.