Marathwada University  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada University Logo Misuse: विद्यापीठाच्या लोगोचा गैरवापर करत ठेकेदाराकडून कुशल कामगारांची भरती

अर्जविक्रीतून प्रति उमेदवार ५०० रुपये उकळले; महिना उलटूनही विद्यापीठ प्रशासन गप्प

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था (धुळे) या ठेकेदाराकडून १०० कुशल कामगारांची भरती प्रक्रिया रावबण्यात आली. यात जाहिरात देताना या ठेकेदाराने चक्क विद्यापीठाच्या लोगोचा वापर करून आपले काम साध्य केले आहे. खासगी कंपनीला विद्यापीठाचा लोगो वापरण्याचा अधिकार नसतानाही मात्र विद्यापीठ प्रशासन तब्बल एक महिन्यापासून मूग गिळून गप्प आहे.

विद्यापीठाने नुकतीच धुळे येथील आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या ठेकेदाराला १०० कुशल कामगार पुरवण्याची मान्यता दिली आहे. यानंतर ठेकेदाराने विद्यापीठाचा लोगो वापरून अधिकृत वाटेल अशा स्वरूपाची जाहिरात प्रसिद्ध केली. यात पदवीधर आणि कामाचा अनुभव, तसेच मराठी, इंग्रजी टायपिंग आणि एमएससीआयटी उत्तीर्ण असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल, असे नमूद करण्यात आले होते. या भरतीसाठी उमेदवारांकडून प्रति फॉर्म ५०० रुपये आकारून फॉर्मची विक्री करण्यात आली. ऐन दुष्काळात उमेदवारांकडून ५०० रुपये उकळल्याने संताप व्यक्त होत आहे.

विद्यापीठ प्रशासन साखर झोपेत

ही जाहिरात ३१ ऑगस्ट रोजी काही वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. त्यात विद्यापीठाच्या नावासह त्यांचा लोगो आणि संपर्कासाठी मात्र संस्थेचे क्रमांक अशी जाहिरात प्रकाशित होऊन तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटूनही यावर विद्यापीठ प्रशासनाने साधीही विचारणाही केली नाही. आता मात्र माहिती घेऊन सांगतो म्हणून हात झटकण्याचे काम करत असल्याने शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत.

पैसे मागितल्याची चर्चा

जे उमेदवार परीक्षेत पास झाले, त्यांच्याकडे संस्थेच्या लोकांनी एक लाख रुपये द्या तरच १८ हजार रुपये पगार दिला जाईल अशी बतावणी केल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. या भरती प्रक्रियेतील बहुतांश उमेदवार हे विद्यापीठातीलच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत. पैसे मागितल्याने काहींनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला. यावर आम्हालाही विद्यापीठातील अधिकाऱ्यांना काही प्रमाणात पैसे वाटावे लागतात असे म्हटल्याने कोणत्या अधिकाऱ्यांचे या ठेकेदाराशी लागेबांधे आहेत, यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT