छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर दीड वर्षात तब्बल ३२ माजी नगरसेवकांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यातील २३ जणांनी शिंदे सेनेत तर ३ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंरतु, ही गळती अजूनही सुरूच असून शनिवारी (दि. २०) आणखी माजी नगरसेवक मनोज गांगवे आणि माजी नगरसेविका आशा भालेराव यांनीही ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ठाकरे सेनेकडे केवळ १२ माजी नगरसेवकच शिल्लक राहिले आहेत.
शिवसेनेच्या विभाजनानंतर शहरात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह माजी महापौर, नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्यास सुरुवात केली. दीड वर्षात मोठ्याप्रमाणात पदाधिकारी शिंदे सेना आणि भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आज ठाकरे सेनेत अस्वस्ततेचे वातावरण आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाही राज्याचे माजी विरोधी पक्षनेता अंबदास दानवे आणि शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पक्षाला लागलेली गळती रोखण्यात अपयशच येताना दिसत आहे.
तीन दिवसांपूर्वीच दोन माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बेगमपुराचे माजी नगरसेवक विनायक पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही प्रवेश प्रक्रिया होत नाही तोच शनिवारी पूर्व आणि फुलंब्री मतदार संघातील ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक आशा नरेश भालेराव आणि मनोज गांगवे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. दीड वर्षांत ठाकरे सेनेचे ५ माजी नगर-सेवक भाजपच्या तर २३ शिंदेसेनेच्या गळाला लागले आहेत.
शिल्लक माजी नगरसेवक
राजू वैद्य, बन्सी जाधव,सीताराम सुरे, कमलाकर जगताप, यशश्री बाखरिया, मनिषा लोखंडे, सचिन खैरे, सुभाष शेजवळ, ऋषिकेश खैरे, आत्माराम पवार, सीमा चक्रनाराणय, स्मिता घोगरे