घाटनांद्रा : कन्नड, सिल्लोड व सोयगाव तालुक्यांना जोडणारा नाचनवेल-शेलगाव-घाटनांद्रा-बोरमाळ-तिडका-वरठाण-गोंदेगाव-निंभोरा-पाचोरा हा रस्ता क्र. ४० व ४८ सध्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करून घाटनांद्रा घाटासह सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील १३ गावांतील सुमारे दोन हजार ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांसह मुख्यमंत्री सचिवालयात निवेदन सादर करण्यात आले.
मराठवाडा व खानदेशाला कमी अंतराने जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. मागील वर्षी १५ व १६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटनांद्रा घाटातील भराव वाहून गेला होता. घाटातील कठडे तुटल्याने तब्बल चार महिने बससेवा व इतर वाहतूक बंद होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र, आजही घाट परिसरात दरडी कोसळणे, भराव वाहून जाणे तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडण्याच्या घटना घडत असल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.
जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण वाघ व नाचनवेलचे माजी उपसरपंच रावसाहेब शिंदे यांनी १७ सप्टेंबर २०२५ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक आमदार, खासदार तसेच संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अनेक निवेदने, आंदोलने व बैठका घेऊनही ठोस निर्णय न झाल्याने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मेपासून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली.
कायमस्वरूपी उपाययोजना
हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून या मार्गावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे सिल्लोड-सोयगाव तसेच कन्नड-सोयगाव मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालून शासनाकडून तातडीने निधी उपलब्ध करून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
नाचनवेल, शेलगाव, घाटनांद्रा, बोरमाळ, तिडका, पळाशी, बनोटी, वरठाण, वाकडी, घोरकुंड, म्हशेकोठा, निंभोरा आणि गोंदेगाव या १३ गावांतील सुमारे दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह १ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालयात निवेदन सादर करण्यात आले. रस्त्याचे व घाटनांद्रा घाटाचे लवकरात लवकर नूतनीकरण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण यांनी तिडका ते घाटनांद्रा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता; मात्र तो मंजूर झाला नसल्याची माहिती दिली. आता या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येणार असून शासनाकडून निधी मिळविण्यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.