Chhatrapati Sambhajinagar Siddharth Park accident case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना ११ जूनला घडली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी दुसऱ्याच दिवशी स्ट्रक्चरल ऑडिटसाठी एजन्सी नियुक्त करून ४ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. परंतु, स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवालाच काय तर या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवरही अद्याप कुठलीच कारवाई झाली नसल्याने चौकशी प्रक्रियेवरच संशय व्यक्त होत आहे.
महापालिकेने बीओटी तत्त्वावर सिद्धार्थ उद्यानाच्या समोरील बाजूला शॉपिंग कॉम्प् लेक्स उभारले आहे. या कामासाठी विकासक नियुक्त करण्यात आले होते. प्रकाश डेव्हलपर्स असे या विकासकाचे नाव असून, त्यांनी अर्थव आणि सुनील डेव्हलपर्स यांच्यासोबत जॉइंट वेंन्चरमध्ये हे काम केले आहे. या विकासकांमध्ये मागील अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. त्याच वेळी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी विकासकाच्या कामाच्या दर्जावर संशय व्यक्त करीत स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले होते. तसे पत्रही या विकासक एजन्सीला देण्यात आले होते.
महापालिकेने यात विकासकाला वारंवार नोटीस दिल्या, परंतु विकासकाने नोटीसला केराची टोपलीच दाखवली. असे असतानाही प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही अन् आता दुर्घटना घडल्यानंतर तातडीने विकासकावर गुन्हा दाखल करून दोषी अधिकाऱ्यांच्या बचावाचा प्रयत्न सुरू आहे.
त्यामुळेच सध्या स्ट्रक्चरला ऑडिटसह या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीकडेच प्रशासनाच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.
सिद्धार्थ उद्यानातील या दुर्घटनेच्या चौकशीसाठी प्रशासक जी. श्रीकांत यांनी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मागील आठ दिवसांपासून अतिरिक्त आयुक्त पाटील यांच्या दालनात दररोज दुपारनंतर याबाबत बैठकांचा सपाटा सुरू आहे. प्रत्यक्षात कोणावरच कारवाई झाली नसून स्ट्रक्चरल ऑडिटही गुलदस्त्यात आहे.