छायाचित्रात ठप्प झालेली वाहतूक. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar traffic : शिवाजीनगर भुयारी मार्गात बस पडली बंद, वाहतूक ठप्प

सातारा-देवळाईकडे जाणारा मार्ग विस्कळीत : विद्यार्थी, नोकरदारांची मोठी गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एका खासगी कंपनीच्या कामगारांची ने-आण करणारी बस तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी (दि.४) सकाळी शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या मध्यभागीच बंद पडली आणि अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे तब्बल तीन तास भुयारी मार्गातील वाहतूक विस्कळीत राहिली. त्यामुळे सातारा, देवळाई, बीड बायपास परिसरातून शहराकडे येणाऱ्या तसेच शहरातून या भागात जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना मोठा फटका बसला. या बंद पडलेल्या बसची सकाळी साडेअकरा वाजता दुरुस्ती झाल्यानंतर या मार्गातील वाहतूक सुरळीत झाली.

शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या मध्यमागी कंपनीच्या कामगारांची ने-आण करणारी खासगी बस मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बंद पडली. त्यामुळे या मार्गातून दुचाकीही जाऊ शकत नव्हती. हा मार्ग अरुंद असून तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली बस जागीच उभी होती. त्यानंतर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

याप्रकारामुळे शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, नोकरदार, व्यावसायिकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अनेकांनी वेळ वाचविण्यासाठी संग्रामनगर उड्डाणपुलावरून वळसा घेतला. त्यामुळे तेथेही वाहनांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दुरुस्तीनंतर बस हलवण्यात आली. तसेच गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भुयारी मार्गावरील रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे दुचाकी घसरून पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

अशा परिस्थितीत बस बंद पडल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. पोलिस व संबंधित यंत्रणेने बस हटविण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर तीन तासांनी या मार्गातील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. हा भुयारी मार्ग पावसाळ्यात पाणी साचणे, वाहतूक कोंडी, अपघात आणि निसरड्या रस्त्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.

आजच्या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था, तात्काळ क्रेनची उपलब्धता आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

वाहतूक कोंडी नीत्याची, मार्गात वारंवार अडचणी

पावसाळा सुरू झाला की शिवाजीनगर भुयारी मार्गात पाणी साचणे, रस्ता निसरडा होणे, दुचाकी घसरणे आणि वाहतूक कोंडी ही नीत्याची बाब बनली आहे. त्यात आता बस बंद पडून तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावरील सुरक्षितता आणि वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT