Chhatrapati Sambhajinagar Property Fraud  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Property Fraud : बोगस कागदपत्रांवर टोलेजंग इमारतींना बांधकाम परवानगी

मनपाच्या प्रक्रियेवर संशय, नगरभूमापनकडून रेकॉर्ड तपासणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहानुरवाडी-उस्मानपुरा परिसरातील सीटीएस क्रमांक १६३१५ मधील ११ एकर जागेत शहरातील सर्वात उंच अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जागा हस्तांतरण करण्यात आल्याबाबत नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कागदपत्रांची शहानिशा न करताच महापालिकेने बांधकाम परवानगी दिली तरी कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे नगरभूमापन विभागानेही त्यांच्याकडील रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केल्याची माहिती प्रशासकी यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

मुंबई-पुण्याप्रमाणे शहराची वाटचालही आता उंच टॉवर अपार्टमेंट उभारण्याकडे सुरु झाली आहे. विकासाच्या दृष्टीने हे एक चांगले पाऊल आहे. त्यामुळे या उंच टॉवरच्या बांधकामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, या टॉवरच्या जागेवरच आता संशय निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. चार दिवसांपूर्वीच या सीटीएस क्रमांक १६३१५ जागेबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात टोलेजंग इमारतींची ही जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरीत करण्यात आल्याचे गुन्ह्यात नमुद केले आहे. त्यामुळे संपूर्ण बांधकामच आता वादात अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, महापालिका एकीकडे परवानगी घेऊनच बांधकाम करा, असे आवाहन करीत असते. त्यासाठी सध्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा सपाटा देखील सुरू केला आहे. त्यात शहानुरवाडी येथील १६३१५ क्रमांकाच्या जागेतील बांधकामाला परवानगी देताना महापालिकेने कागदपत्रांची शहानिशा केली नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

बनावट कागदपत्रा आधारे जागेचे हस्तांतरण झाल्याबाबात गुन्हा दाखल झाल्यामुळेच हा संशय अधिकच वाढला आहे. महापालिकेने हातापासूनच या प्रकरणात हात झटकण्याची तयारी सुरू केल्याची देखील चर्चा नगररचना विभागातून ऐकावसाय मिळत आहे. परंतु, असे असले तरी या एका गुन्ह्यामुळे या बांधकामावर अनेक सवाल उपस्थित होत आहे.

मनपात खळबळ

टोलेजंग इमारतीला बांधकाम परवानगी देताना कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर आता महापालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचेही धाबे दणाले आहेत. पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्याही मागे लागणार असल्याने अधिकारी धास्तावल्याची चर्चा आहे.

आम्ही कागदपत्रे तपासणार या प्रकरणाबाबत काही माहिती नाही. परंतु, आता सीटीएस १६३१५ क्रमांकाच्या जागेचे कागदपत्रे बनावट असल्याबाबत गुन्हा दाखल झाला असल्याने त्याबाबतचे रेकॉर्ड तपासण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. या तपासणीनंतरच सत्यता पुढे येईल. -
चंद्रकांत सेवक, नगरभूमापक, सिटी सर्व्हे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT