छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेला बळकटी देण्यासाठी अपघातमुक्त जिल्हा उपक्रमांतर्गत ग्रामीण पोलिस दलाला आधुनिक सुविधांनी सुसज्ज इर्टिगा इंटरसेप्टर वाहन प्राप्त झाले. या वाहनाच्या वापरामुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर तात्काळ आणि कठोर कारवाई शक्य होणार असून, अपघातांचे प्रमाण घटविण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत, सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या तांत्रिक सहाय्याने राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या अपघातमुक्त जिल्हा कार्यक्रमासाठी देशातील १०० जिल्ह्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर जिल्हाही या यादीत आहे. देशातील अपघात मृत्यूदरात हा जिल्हा ३७व्या क्रमांकावर असल्याने उपक्रमाची अंमलबजावणी येथे वेगाने करण्यात येत आहे. नवीन इंटरसेप्टर वाहनाचे उद्घाटन ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या मार्गदर्शनानुसार हे वाहन जिल्ह्याला मिळाल्याचे अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी उपअधीक्षक (मुख्यालय) गौतम पातारे, पोलिस निरीक्षक (वाहतूक) आनंद झोटे, पीआय प्रशांत महाजन, संतोष वायचल, तसेच एपीआय केदारनाथ पालवे, पीएसआय अशोक मुंढे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
३२ अपघात प्रवण क्षेत्रांवर गस्त
इंटरसेप्टर वाहनात अतिवेग, नो-हेल्मेट, नो-सीटबेल्ट, काळी फिल्म, मद्यप्राशन करून वाहन चालविणे आदी नियमभंग ओळखण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. महामार्गावरील वाहतूक शिस्त प्रस्थापित होण्यास मोठी चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील ३२ अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्रांवर या वाहनाद्वारे नियमित गस्त, तपासणी करण्यात येणार आहे.