छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे सुरूच राहणार pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Encroachment drive | छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे सुरूच राहणार

बैठकीत निर्णय; विरोध करणाऱ्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहागंज येथे गर्भवती महिलेवर झालेल्या हल्ल्यानंतर पथविक्रेत्यांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. तर पथविक्रेत्यांच्या समर्थनार्थ एमआयएम नगरसेवक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास हातागाड्या जप्त होतील, शिस्तीचे पालन करा, अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरूच राहिल, असे इशारा शनिवारी स्मार्टसिटी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर महापालिका पदाधिकारी, प्रशासनाने दिला आहे.

यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, महापालिका आयुक्त जी.श्रीकांत, अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. शहरात रस्त्यांवर उभ्या करण्यात येणाऱ्या हातगाड्यांच्या संदर्भात महापालिका प्रशासनाने अधिकृत निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की , महापालिकेच्या हद्दीतील सर्व हातगाडी व टपरीचालक अनधिकृतपणे व्यवसाय करून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे.

नियम आणि शिस्तीचे पालन करून व्यवसाय केल्यास कुठलीही कारवाई महापालिका करणार नाही. परंतु, बेशिस्तपणे आणि रस्त्याच्या मध्यभागी येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास हातगाड्या आणि टपरीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने त्यामुळे मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. कटकटगेट, चिकलठाणा भागात नुकतीच आगीची घटना घडली आहे. या भागातील अतिक्रमणांमुळे अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका वेळेवर घटनास्थळी पोहचू शकले नाहीत. शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते अरुंद आहेत, त्यात अतिक्रमणांची भर पडली आहे. यापुढे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बैठकीत काही निर्णय घेण्यात आले.

बैठकीनंतर महापालिकेच्या वतीने प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. दरम्यान, या बैठकीबाबत माहिती देतांना उपमहापौर जंजाळ म्हणाले की, अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहरात सुरूच राहणार आहे. सध्या शिस्तीत व्यवसाय केल्यास कोणावरही कारवाई होणार नाही. परंतु, बेशिस्त पथविक्रेत्यांवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवकांवर होणार कारवाई

हातगाड्या, टपरीची अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला विरोध केल्यास नगरसेवक, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, संस्था, नागरिकांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

दादागिरी चालणार नाही - राजेंद्र जंजाळ,उपमहापौर, शिवसेना.

रस्त्यांवरील हातगाड्या व अन्य अतिक्रमणे याबद्दल बैठक झाली. हातगाड्यांना परवानगी देण्यासाठी महापालिका कक्ष उघडणार आहे. कुणाचीही दादागिरी महापालिकेचे प्रशासन सहन करणार नाही. महापालिका नियमानुसार, कायद्यानुसार चालते हे संबंधितांनी लक्षात घ्यावे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT