छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नवाबपुरा भागात अज्ञाताने एका रियल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या तरुणावर गोळीबार केला. बुधवारी (दि.२६) पहाटे चारच्या सुमारास हा थरार घडला. व्यावसायिकाच्या दिशेने आरोपीने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने व्यवसायिक थोडक्यात बचावला. एक गोळी डोक्यावरील टोपीच्या जवळून निघून गेली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)
फिर्यादी हसीब मोहम्मद सलीम काझी (३३, रा. जालीवाली मस्जिदजवळ, नवाबपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रोजा असल्याने ते सकाळी चारच्या सुमारास डेअरीवर दूध, खारी घेण्यासाठी मोपेडने घरून निघाले. ५० फूट अंतरावर जाताच बाजूच्या गल्लीतून फटाका फुटल्यासारखा आवाज आला. त्यांनी मोपेडचे टायर फुटले का हे पाहण्यासाठी मोपेड थांबविली. तेवढ्यात अचानक समोरून १५ फूट अंतरावर सहा फुटाचा सडपातळ अज्ञात व्यक्ती दिसला. त्याने हसीब यांना एक शिवी देऊन त्यांच्या दिशेने हातातील पिस्तुलातून गोळी झाडली. ती गोळी त्यांच्या डोक्यावरील टोपीजवळून गेली. घाबरून हसीब यांनी मोपेड सुरु करून घराच्या दिशेने धूम ठोकली. त्यानंतर त्यांनी मित्र शहाबाज खानला संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दुकान दिलेल्या एका भाडेकरूवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्याने यापूर्वी त्यांच्याविरुद्व गुन्हा देखील दाखल केला होता.
हसीब यांच्या दिशेने आरोपीने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी मोपेडला लागल्याने त्यात छिद्र पडले आहे. ही गोळी पोलिसांनी जप्त केली आहे. पहाटे या भागात लाईट गेल्याने अंधार होता. गोळी झाडणाऱ्या आरोपीने तोंडाला रुमाल बांधला होता, असे हसीब यांनी सांगितले.
घटनास्थळी डीसीपी प्रशांत स्वामी, एसीपी सुदर्शन पाटील, जिन्सीचे ठाणेदार गणेश ताठे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक संदीप सोळंके, विशाल बोडखे, रविकिरण कदम, तपास अधिकारी उपनिरीक्षक साळवे यांनी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली होती. तसेच फॉरेन्सिकचे पथकाला पाचारण करण्यात आले होते.