Rain  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Rain : गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी; दिवसभरात १०.६ मिमी पाऊस

पावसाने तब्बल दीड महिन्यांपेक्षा अधिक काळ दडी मारल्याने नागरिकांसह शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : तब्बल दीड महिन्याच्या खंडानंतर शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून, सलग दुसऱ्या दिवशीही वरुणराजाने हजेरी लावली. शहरात रविवारी (दि. १३) १०.६ मिमी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली. गणरायाचे आगमन सोमवारी (दि. १४) होत असतानाच आजही पावसाची शक्यता असल्याने बाप्पाच्या स्वागताची लगबग आणि पावसाची सर अशी दुहेरी स्थिती पाहायला मिळणार आहे.

पावसाने तब्बल दीड महिन्यांपेक्षा अधिक काळ दडी मारल्याने नागरिकांसह शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते. मात्र शनिवारी (दि. १२) पावसाने पुनरागमन केले. त्यानंतर शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारीही पाऊस झाला. दरम्यान हवामान विभागाकडून यलो अलर्ट दिला जारी करण्यात आला होता. त्यानुसार दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या.

या पावसामुळे विशेषत : शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून ९.४ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात शनिवारपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्याचा शहर व जिल्ह्यातही परिणाम दिसून येत आहे.

दरम्यान, १२, १३ आणि १४ या तीन दिवसांत मराठवाड्यासह राज्यभरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. मात्र सध्या होत असलेला पाऊस अल्पकाळाचा ठरू शकतो, अशी शक्यता एमजीएम वेधशाळेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा पाऊस परतीच्या पावसाची सुरुवात आहे का, याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. दुसरीकडे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुढील तीन ते चार दिवसांत छत्रपती संभाजीनगरसह सर्वदूर समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पावसातही खरेदीची लगबग

घरोघरी आज सोमवारी गणरायाचे आगमन होत असल्याने रविवारी शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशमूर्ती, पूजासाहित्य आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे ग्राहकांसह दुकानदारांचीही तारांबळ उडाली. व्यावसायिकांनी दुकानांवर पानकापड टाकून साहित्याचे पावसापासून संरक्षण केले. गणरायाचे आगमन होत असल्याने आजही पावसाच्या सरी कोसळल्यास भक्तांचा उत्साह आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पिकांना संजीवनीची आशा

दीर्घकाळ पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील अनेक पिके करपली असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अन्य भागांत पिकांच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक असा दमदार पाऊस झालेला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, पुढील तीन दिवस अपेक्षित असलेल्या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात तरी संजीवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT