Chhatrapati Sambhajinagar Rajnagar Mukundnagar Rail Protest
छत्रपती संभाजीनगर : राजनगर मुकूंदनगर वार्ड क्र. 90 येथील नागरिकांना शहरात येण्यासाठी असलेला छोटासा भुयारी मार्ग रेल्वे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील रहिवाश्यांनी सोमवारी (दि.२१) दुपारी १२ वाजता नांदेडकडे जाणारी रेल्वे अर्धा तास रोखून धरली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
या परिसरातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून किंवा तेथेच असलेला एकमेव छोटासा भुयारी मार्ग वापरावा लागत होता. तोही मार्ग बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याचे समजताच परिसरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी गेट न.५६ जवळील राजनगर परिसरात रुळावर ठिय्या मांडला. त्याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून नंदेडकडे जाणारी रेल्वे अर्धा तास रोखून धरली. रेल्वे रोखल्याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी नागरिकांना बाजूला करून रेल्वेला मार्गस्थ केले.
परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून रोज ये जा करावी लागत आहे. त्यात हा रस्ता बंद करण्यात येत आहे. आम्ही शहरात यायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करत अगोदर भुयारी मार्ग करा, त्यानंतरच हा मार्ग बंद करा, अशी मागणी नागरिकांनी केली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने या परिसरात लोहमार्ग पोलिसासह रेल्वे सुरक्षा दलाचा तगडा बंदोबस्त लावला आहे. दरम्यान मागणी मान्य होईपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करणार असल्याचा निर्धार येथील नागरिकांनी केला आहे.