पिशोर : पिशोर येथील बाजार पट्टीला लागून असलेल्या अंजना नदीवर अमराई रस्त्यालगत असलेल्या पुलावरून श्रावण निवृत्ती मोकासे (वय १० वर्षे) हा चौथीतील विद्यार्थी आज (२९ सप्टेंबर) दुपारी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीला सतत पूर येत आहे. अशातच हा लहान मुलगा पुलावरून जात असताना तोल जाऊन नदीच्या प्रवाहात पडला. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.
या आधीही भरबा तांडा रस्त्यावर एक शाळकरी मुलगी वाहून जाताना थोडक्यात बचावली होती. मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. हस्ता ते भिलदरी दरम्यान कुठेही सुरक्षित पूल नसल्याने नागरिक जीव धोक्यात घालून नदी पार करत आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अंजना नदीवर तातडीने सुरक्षित पूल उभारण्याची जोरदार मागणी केली जात आहे.