निधी वाटपाच्या वादानंतर सभा तहकुब करण्यात आल्याने नाराज झालेल्या पं.स. सदस्यांनी पंचायत समितीच्या सभागृहाबाहेर असा ठिय्या दिला होता. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Panchayat Samiti cess fund : सेस फंडावरून संभाजीनगर पंचायत समितीच्या सभेत 'राडा'

८० लाखांच्या निधी वाटपावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; राष्ट्रगीत सुरू करून सभा गुंडाळली, सदस्यांचे ठिय्या आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सेस फंडातील ८० लाख रुपयांच्या निधीच्या वाटपावरून मंगळवारी (दि. ८) झालेल्या मासिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. निधी वाटपात विरोधकांच्या गावांना डावलण्यात आल्याचा आरोप करत सत्ताधारी गटासोबत असलेल्या शिवसेनेचे सदस्य अनुराग शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत सभेच्या कार्यवृत्ताची प्रत फाडून सभागृहात भिरकावली. त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर सभापती कल्याण गायकवाड यांनी राष्ट्रगीत सुरू करून सभा गुंडाळली.

पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी दुपारी दीड वाजता सभापती कल्याण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. सुरुवातीपासूनच सेस फंडातील ८० लाखांच्या निधीचा मुद्दा चर्चेत आला. या निधीत सत्ताधारी सदस्यांच्या गावांनाच निधी देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर अनुराग शिंदे यांनी संतप्त होत सभेच्या कार्यवृत्ताची प्रत फाडून टाकली. त्यांच्या भूमिकेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते दत्तात्रय वर्षे यांच्यासह इतर सदस्यांनी पाठिंबा दिला.

दरम्यान, निधी वाटपाचा ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे सभापती गायकवाड यांनी स्पष्ट केले. मात्र, सदस्यांचा गोंधळ सुरूच राहिल्याने सभापतींनी राष्ट्रगीत सुरू करण्याचे आदेश देत सभा तहकूब केली. दरम्यान, पंचायत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त करत काही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ गोधळची स्थिती पहायला मिळाली.

सभागृहाबाहेर ठिय्या

सभा अशा पद्धतीने गुंडाळल्याने संतप्त सदस्यांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत सदस्यांनी निधी वाटपावर आक्षेप नोंदविला. प्रभारी गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर सदस्यांना पुन्हा सभागृहात नेऊन चर्चा करण्यात आली.

चर्चेनंतर सत्ताधारी सदस्यांना चार लाख, तर विरोधकांना तीन लाख रुपये निधी देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी उपसभापती बाळासाहेब गाढे यांच्यासह अधिकारी व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. सभापती कल्याण गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT