Chhatrapati Sambhajinagar 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar: पैठण निवडणूक प्रशासनाचा सावळागोंधळ; मध्यरात्रीपर्यंत उमेदवार ताटकळत, संतापाची लाट

९ जिल्हा परिषद गटांसाठी १०९, तर पंचायत समितीसाठी १७९ अर्ज दाखल

पुढारी वृत्तसेवा

चंद्रकांत अंबिलवादे

पैठण : तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रशासकीय नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत राहावे लागले, ज्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रशासनाची दिरंगाई आणि वाढता तणाव

पैठणमधील ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. मात्र, निवडणूक यंत्रणेच्या संथ कारभारामुळे रात्री १० वाजेपर्यंत अर्जांची निश्चित आकडेवारी समोर येऊ शकली नाही. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी माहिती विचारली असता, त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

अखेर मध्यरात्री उघडला अर्जांचा पिटारा

अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर, रात्री साधारण ११:३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे आणि तहसीलदार ज्योती पवार यांनी अर्जांची अधिकृत संख्या जाहीर केली. जिल्हा परिषद (९ गट) १०९, पंचायत समिती (१८ गण) १७९ असे एकूण अर्ज २८८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

रात्री उशिरापर्यंत अर्जांची संख्या गुलदस्त्यात ठेवल्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर इच्छुक उमेदवारांनी शंका उपस्थित केली आहे. प्रशासनाच्या या अडमुठ्या धोरणामुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला असून, पुढील प्रक्रियेत तरी सुधारणा होईल का? असा सवाल आता विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT