Kaun Banega Crorepati Season 17 Paithan Kailash Rambhau Kuntewad
छत्रपती संभाजीनगर : लहानपणी शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या आणि सध्या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या एका मराठमोळ्या तरुणाने 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय कार्यक्रमात ५० लाख रुपयांची रक्कम जिंकून एक अविश्वसनीय इतिहास रचला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि मजूर कैलास रामभाऊ कुटेवाड असे या यशस्वी तरुणाचे नाव आहे. 'पुढारी न्यूज'ला प्रतिक्रिया देताना कैलासने प्रवासच उलगडला.
कैलास कुटेवाड हा पैठण तालुक्यातील बालानगर जवळील एका ६०० जणांच्या छोट्या वस्तीत राहतो. त्याच्या कुटुंबाकडे केवळ दोन एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेतीत उत्पन्न न झाल्यास कैलास मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावतो.
लहानपणी शाळेत अत्यंत हुशार असूनही योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्याला पुढील शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे मनात शिक्षणाची कायम खंत होती. तरीही, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची त्याची जिद्द मात्र कायम होती.
कैलास कुटेवाड याने गेल्या पाच वर्षांपासून केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी अथक प्रयत्न केले. अखेर, त्याला सहाव्या प्रयत्नाला यश आले आणि त्याची निवड झाली. या संधीचे सोने करत त्याने हॉट सीटपर्यंत मजल मारली आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर थेट ५० लाख रुपयांची मोठी रक्कम जिंकली.
जसं जसे प्रश्न आले तसे मला माझ्या ज्ञानाचा फायदा मिळाला आणि मी पुढे पुढे सरकत गेलो. जी उत्तर येत होती ती देण्याचा प्रयत्न केला आणि जिथे लाईफलाईनची गरज वाटली तिकडे लाईफलाईन घेतली. 1 कोटीच्या प्रश्नावर माघार घेतल्याची मला कुठलीही खंत नाही.कारण हा प्रश्न माझ्या कधीही वाचनात आला नव्हता. त्यामुळे तो मला खूपच कठीण गेला. या प्रश्नासाठी दोन लाईफलाईन शिल्लक होत्या त्या देखील वापरल्या तरी उत्तर मिळालं नाही.त्यामुळे खूप मोठा धोका होता.त्यामुळे तो धोका न पत्करता 50 लाख रूपये घेऊन मी बाहेर पडलो. याबाबत माझ्या मनात कुठलीही खंत नाही. मी समाधानी आहे,असे कैलास कुटेवाड सांगतात.
महानायक अमिताभ बच्चन यांना भेटणं हे प्रत्येकाचे स्वप्नच असते. केबीसीमुळे मला अमिताभ बच्चन यांना भेटता आले. माझ्यासाठी तो क्षण अविस्मरणीय होता.कैलास कुटेवाड, पैठण
कैलास त्याच्या प्रवासाबद्दल पुढे म्हणाला, जसे जसे प्रश्न समोर आले, तसतसा मी मिळवलेल्या माहितीचा उपयोग होत गेला. मी यशस्वीपणे पुढचा टप्पा गाठत गेलो. ज्या प्रश्नांची उत्तरे निश्चितपणे माहिती होती, ती दिली, तर आवश्यकतेनुसार लाईफलाईनचा वापर केला. एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर माघार घेतल्याची मला कुठलीही खंत वाटत नाही, कारण तो प्रश्न माझ्या कधीही वाचनात आला नव्हता. त्यामुळे तो माझ्यासाठी अत्यंत कठीण ठरला. या प्रश्नासाठी माझ्याकडे दोन लाईफलाईन्स शिल्लक होत्या, त्या वापरल्या; तरीही अचूक उत्तर मिळाले नाही. अशा स्थितीत खूप मोठा धोका पत्करावा लागला असता. म्हणून, तो धोका न पत्करता मी ५० लाख रुपये घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल माझ्या मनात कोणतीही खंत नाही. मी माझ्या यशावर पूर्णपणे समाधानी आहे,’ असंही तो सांगतो.
पैठण तालुक्यातील एका छोट्याशा गावातून थेट केबीसीच्या हॉट सीटपर्यंतचा त्याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचे हे यश संपूर्ण परिसरासाठी एक मोठा अभिमानाचा क्षण असल्याचेही गावक-यांनी म्हटले आहे.