पैठण: तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील नाथसागर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या वरच्या भागात तसेच तालुक्यातही संततधार पाऊस सुरू असल्याने नाथसागरमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या धरणात १ लाख ५२ हजार क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने तातडीने मोठा निर्णय घेतला आहे.
धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय
धरणातील पाण्याच्या वाढत्या आवकेमुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपअभियंता मंगेश शेलार आणि रितेश भोजने यांनी धरणाचे ९ आपत्कालीन दरवाजे चौथ्यांदा उघडले आहेत. यासह धरणाचे सर्व २७ दरवाजे वापरून गोदावरी नदीत १ लाख २२ हजार ११६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता
पावसाची स्थिती पाहता, धरणाच्या नियंत्रण पथकाने आज, रविवार दि. २८ रोजी दुपारी नाथसागर धरणातून होणाऱ्या विसर्गामध्ये आणखी वाढ करण्याची योजना आखली आहे.
गोदावरी नदी दुथडी भरून वाहते
धरणातून प्रचंड पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. सोडलेले पाणी नदीपात्रातून सुरळीत पुढे जावे यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. आपेगाव आणि हिरडपुरी येथील उच्च पातळी बंधाऱ्यांचेही सर्व दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. बंधारा नियंत्रण अधिकारी राजपूत यांनी ही माहिती दिली आहे.
नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
नाथसागर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, न.प. मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि नगरपरिषद कर्मचारी नदीकाठच्या गावांमध्ये पोहोचले आहेत. नवरात्र देवीच्या मंडपातून आणि दवंडीद्वारे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाऊ नये, तसेच जनावरांना नदीजवळ सोडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.