Sambhajinagar Paisewari Report 2026 AI Image
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Paisewari Report 2026 : जिल्ह्याची सुधारित पैसेवारीही ४५.७२ पैसेच

१३५४ गावे ५० पैशांच्या आत; कन्नड, वैजापूर, खुलताबाद सर्वांत कमी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा खंडकाळ अधिकप्रमाणात राहिला. अनियमितता आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांच्या उत्पादनावर मोठे परिणाम झाले असून त्यामुळे २०२६-२७ च्या खरीप हंगामाची नजर पैसेवारीनंतर ३१ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने खरीपासाठी ११९३ आणि रब्बीसाठी १६१ अशी १३५४ गावांची सुधारीत पैसेवारी जाहीर केली. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५० पैशाच्या आत म्हणजेच अवघी ४५.७२ पैसे आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारीत पैसेवारीच्या आकडेवारीतून खरीप हंगाम पूर्णतः हातून गेल्याचेच चित्र दिसून येते आहे. जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्र ७ लाख ९१ हजार ५९४.३२ हेक्टर आहे. त्यापैकी ७ लाख ५४ हजार ९५२.१८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली होती. तर ५३ हजार ९९४.५ हेक्टर क्षेत्र पडिक राहिले आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पेरणी झाली. परंतु, प्रत्यक्षात खरीप पिकाला आवश्यक असतांना पाऊस बरसला नाही. शिवाय, मान्सूनच्या चारही महिन्यात पावसाचे खंडकाळ अधिकप्रमाणात राहिले. त्यामुळे जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांपर्यंत पोहोचू शकलेला नाही.

जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले नाही. त्यामुळे मोठ्याप्रमाणात खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यांची आकडेवारी पाहता गंगापूर तालुक्याची पैसेवारी ४८.०७ पैसे असून, जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर अप्पर तहसिल ४८,फुलंब्रीची ४७, पैठणची ४६.११ आणि सिल्लोडची ४६ पैसेवारी आहे. छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव तालुक्यांची पैसेवारी प्रत्येकी ४५ पैसे नोंदविण्यात आली आहे.

खरीप हंगामात पेरणीचे क्षेत्र मोठे असले तरी उत्पादनाची स्थिती अपेक्षेप्रमाणे नसल्याचे सुधारीत पैसेवारीतून समोर आले आहे. शेतीचा वाढता खर्च, पिकांच्या उत्पादनातील घट आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. त्यातच जिल्ह्यातील एकाही तालुक्याची पैसेवारी ५० पैशांवर नसल्याने शेतकऱ्यांना आता शासनाकडून दिलासा देणाऱ्या उपाययोजनांची प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT