Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : पुंडलिकनगरात गुंडांची दहशत; तरुणावर चाकूहल्ला करून रोकड लुटली

दुसऱ्या दिवशी हायकोर्टाजवळील नाश्त्याच्या हॉटेलसमोरही धुडगूस ; डॉन बनू पाहणाऱ्या सराईत ऋषिकेश पालोदकरसह टोळीवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्याशी सुरू असलेल्या वादात एका तरुणाला विरोधी गटाचा समजून, तुला माज आला का? असे म्हणत धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. त्याचा मोबाईल रस्त्यावर आपटून फोडत खिशातील रोकड लुटून घेतली आणि तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे जात असताना पुन्हा भररस्त्यात चाकू उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पुंडलिकनगर हद्दीतील पहाडे कॉर्नर रोडवर सोमवारी (दि. १९) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी या गुंडाने सिडको एन-४, हायकोर्ट परिसरातील एका हॉटेलसमोर तुफान राडा घातल्याने पोलिसांचा धाक संपला का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. याप्रकरणी सराईत गुन्हेगार ऋषिकेश पालोदकर आणि त्याचा साथीदार राहुल भोसले व इतरांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यात अरबाज अनिस पटेल (२१, रा. गल्ली क्र. ३, हनुमान नगर, गारखेडा परिसर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तो कामाच्या संदर्भात बोलण्यासाठी मित्र फजल शेख याला फोन करून पहाडे कॉर्नर रोडवरील डीपीजवळ थांबला होता.

त्यावेळी बाजूलाच सराईत आरोपी ऋषिकेश पालोदकर याचे इतर काही मुलांसोबत कडाक्याचे भांडण सुरू होते. पालोदकरने अरबाजकडे पाहिले आणि तो विरोधी गटातील असल्याचा संशय घेतला. पालोदकर थेट अरबाजच्या दिशेने धावत आला आणि त्याची कॉलर पकडून, तुला माज आला का? असा दम भरला.

अरबाजने मी तुला ओळखतही नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला असता, पालोदकरने शिवीगाळ करत खिशातील धारदार वस्तू काढून थेट त्याच्या डाव्या मांडीवर वार केले. त्याचवेळी सोबत असलेल्या राहुल भोसले यानेही धारदार शस्त्राने अरबाजच्या पायाच्या पाठीमागील बाजूस खोलवर वार करून त्याला रक्तबंबाळ केले.

मोबाईल फोडला, रोकड लुटली अन् पुन्हा चाकू घेऊन धावले

हल्ल्यानंतर पालोदकरने अरबाजच्या खिशात हात घातला आणि तू पण घाव (हत्यार) आणला आहेस का? असे म्हणत त्याचा मोबाईल रस्त्यावर फेकून फोडून टाकला. त्याच्या खिशात मजुरीचे असलेले ३ हजार ३५० रुपये बळजबरीने काढून घेतले. जीव वाचवण्यासाठी अरबाज तिथून पळत असताना, पालोदकर आणि भोसले हे दोघेही हातात धारदार शस्त्रे घेऊन त्याच्या पाठीमागे धावले.

कसातरी जीव वाचवून अरबाजने घर गाठले आणि भाऊ आसिफला प्रकार सांगितला. दोघे भाऊ तक्रार देण्यासाठी पुंडलिकनगर ठाण्याकडे जात असताना, हनुमान नगरातील शासकीय शौचालयाजवळ पालोदकरने पुन्हा त्यांच्यासमोर चाकू उगारला. थांब थांब, तुला आता मारूनच टाकतो अशी धमकी देत तो त्यांच्या अंगावर धावून आला. दोघांनी पळ काढून थेट पोलिस ठाणे गाठल्याने अनर्थ टळला.

बारनंतर नाश्त्याच्या हॉटेलमध्ये धुडगूस; तरुणांना बेदम मारहाण

या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी एका बारसमोर आणि त्यानंतर सिडको एन-४, हायकोर्टाच्या बाजूला असलेल्या एका नाश्त्याच्या हॉटेलमध्ये ऋषिकेश पालोदकर याने तुफान राडा केला. तिथे नाश्ता करत असलेल्या काही तरुणांना विनाकारण बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी पालोदकर याला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. मात्र, तक्रार देण्यासाठी कोणीही न आल्याने त्याच्यावर कारवाई करून सोडण्यात आले होते. रात्री हा गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक केले जाईल असे पोलिसांनी सांगितले.

टोळी जमवून 'डॉन' बनण्याचे स्वप्न

पुंडलिकनगर व गारखेडा भागातील कुख्यात गुंडांना पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी यापूर्वीच खाक्या दाखवून त्यांचा योग्य बंदोबस्त केला होता. मात्र, आता पालोदकरसारखे सराईत गुन्हेगार छोट्या-मोठ्या टोळ्या जमवून परिसरात दहशत पसरवत डॉन बनण्याचे स्वप्न पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे यांचाही पोलिस कसा बंदोबस्त करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT