छत्रपती संभाजीनगर : भद्रा मारुती दर्शनावरून परतताना शनिवारी (दि.१५) फुलंब्रीजवळ दुचाकीचा अपघात झाला. यात ऋषिकेश ऊर्फ अजय अनिल गव्हाणे (२४, रा. जयभवानीनगर) या तरुणाचा पाय गंभीरीरत्या फॅक्चर झाला होता. त्याला तात्काळ मुकुंदवाडी भागातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
रविवारी (दि.16) दुपारी त्याच्या पायात रॉड टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शास्त्रक्रियेनंतर तो शुद्धीवर आलाच नाही. परिस्थिती हाताबाहेर जाताच सह्याद्री हॉस्पिटलमधून डॉक्टरांनी ऋषिकेशला सिडको चौकाजवळील वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये हलविले. मंगळवारी त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईक आक्रमक झाले होते. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत पाच तास ठिय्या दिला. सामाजिक कार्यकर्ते सुनील कोटकर आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋऋषिकेशच्या वडिलांच्या निधनानंतर त्याचा व त्याच्या बहिणीचा आईने भाजीपाला, कडधान्य विक्री करून सांभाळ केला. बहिणीचा विवाह झाल्यानंतर ऋषिकेशने शिक्षण पूर्ण केले व काही काळ पुणे येथे पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम केले. दीड वर्षापूर्वी तो नोकरी सोडून जालना येथे मामाकडे राहू लागला. मामासोबत स्कूल व्हॅन चालवून तो उदरनिर्वाह करत होता. शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी तो मित्रांसह खुलताबाद येथील भद्रा मारुती दर्शनाला गेला होता. दर्शनानंतर खुलताबाद-फुलंब्रीमार्गे परतताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात उजव्या पायाचे मांडीत हाड मोडले होते. त्याला फुलंब्री येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रामनगर विठ्ठलनगर येथील सर्व्हिस रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास पायात रॉड टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर ऋषिकेश शुद्धीवर आला नाही. त्यामुळे त्याला रात्री दहाच्या सुमारास सिडको चौकाजवळील वैद्यनाथ सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सोमवारी (दि.17) मध्यरात्री प्रकृती चिंताजनक होऊन त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले. रामनगरमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान केलेल्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला. त्यामुळे प्रकृती चिंताजनक असताना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविले. मंगळवारी (दि.18) सकाळी अकरा वाजेपासून पाच तास वैद्यनाथ हॉस्पिटलसमोर परिसरात मोठा तणाव होता.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे, मुकुंदवाडीचे निरीक्षक सचिन इंगोले, जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार, एपीआय कऱ्हाळे, पीएसआय अर्जुन राऊत, सुनील म्हस्के यांच्यासह मोठा फौजफाटा वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. सामाजिक कार्यकर्ते सुनील कोटकर यांनी मध्यस्थी केली. पोलिस व डॉक्टरांच्या समजुतीनंतर दुपारी अडीचच्या सुमारास नातेवाइकांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी घाटीत हलविला. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऑपरेशन सुरू असताना कार्डियाक अरेस... पायाच्या फॅक्चरचे ऑपरेशन करताना त्या रुग्णाला कार्डियाक अँरेस बसला, त्यातून त्याला बाहेर काढले. प्रकृती स्थिर करून कार्डियाक ॲम्ब्युलन्सने वैद्यनाथ हॉस्पिटल येथे हलवले. तिथे रुग्णावर २८ तास उपचार सुरू होते. त्याच्या उपचाराचा सर्व खर्च आम्हीच दिला.डॉ. सचिन बेदमुथा, संचालक, सह्यादी हॉस्पिटल.
पेशंट आला तेव्हाच गंभीर होता. सह्यादी हॉस्पिटल येथून रविवारी रात्री हा पेशंट आला तेव्हा गंभीर होता. जीव वाचण्याचे एक ट्क्काच चान्स होता. नातेवाइकांनाही कल्पना होती. जीवनरक्षक प्रणालीवर घेऊन आवश्यक उपचार केले. सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.डॉ. संदीप सानप, संचालक, वैद्यनाथ हॉस्पिटल.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. साधे पायाच्या फॅक्चरचे ऑपरेशन होते. त्याचा जीव कसा गेला? याचा जाब डॉक्टरांना विचारला. अशा घटनेत झुंजार छावा नेहमीच नातेवाइकांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहील.सुनील कोटकर, संस्थापक अध्यक्ष झुंजार छावा
आईला म्हणाला त्रास होतोय, माझ्या जवळच राहा
नातेवाइकांच्या माहितीनुसार, ऋषिकेशला ऑपरेशन थियेटरमध्ये घेऊन जाताना त्याने आईला त्रास होतोय, माझ्या जवळच राहा, असे व्यवस्थित बोलला. त्यापूर्वीही त्याला केवळ पायाला त्रास होता. तो सर्वांशी चांगले बोलत होता. मात्र अचानक त्याच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्येच ठिय्या दिला.