गंगापूर ( छत्रपती संभाजीनगर ) : तालुक्यातील मुद्देशवाडगाव परिसरात दि. १४ ऑगस्ट रोजी बारा वर्षीय चुलत भावाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकला होता. पोलिस आपल्याला पकडतील या भीतीने एका बावीस वर्षीय तरुणानेही विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव परिसरात १२ वर्षीय सिद्धार्थ विजय चव्हाण याचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता. पोलिसांच्या तपासात हा खून त्याचाच चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण (२३) याने केल्याचे निष्पन्न झाले. आपल्याला अटक होईल या भीतीने स्वप्नीलने हकीकतपूर शिवारातील संतोष गंगाधर चव्हाण यांच्या गट क्रमांक १८ मधील विहिरीत उडी घेत जीवन संपवले असल्याचे पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी सांगितले.
१४ ऑगस्ट रोजी दुपारी हकीकतपूर शिवारातील सिद्धार्थ किराणा आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. बराच वेळ उलटूनही तो परतला नाही. त्यानंतर शोध घेतला असता भारत दारुंटे यांच्या मक्याच्या शेताजवळ त्याची सायकल, रिकामी पिशवी आणि शंभर रुपयांची नोट पडलेली आढळली. त्याचबरोबर रक्ताचे डाग विहिरीकडे जात असल्याचे दिसून आले. स्थानिकांच्या मदतीने गंगापूर पोलिसांनी शोधमोहीम राबवून रात्री आठच्या सुमारास सिद्धार्थचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. आई सुरेखा विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांतच स्वप्नील बेपत्ता झाला होता. नंतर जनावरांसाठी गवत आणायला गे-लेला तो घरी परतला नाही. दरम्यान, हकीकतपूर शिवारातीलच संतोष गंगाधर चव्हाण यांच्या गट क्रमांक १८ शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. पोलिस पाटील राऊत व सरपंच योगेश तारू यांनी गंगापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. त्याचा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले प्राथमिक तपासानुसार गुन्ह्यात अटक होण्याच्या भीतीने स्वप्नीलने जीवन संपवल्याची माहिती पोलिस निरीक्षक कुमारसिंग यांनी सांगितले.
गंगापूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस या खुनाचा समांतर तपास करत असताना पोलिसांना सिद्धार्थच्या चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण याच्यावर संशय बळावल होता. त्यामुळे त्यांनी तपास करत असताना स्वप्निलच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले. सखोल चौकशीत सिद्धार्थचा खून हा स्वप्नील संजय चव्हाण याने केल्याचे स्पष्ट झाले.