जिल्ह्यातील 6 नगरपरिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले file photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election : सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीचा धुराळा उडणार

कमी कालावधीमुळे प्रशासनाला करावी लागणार कसरत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल मंगळवारी (दि.४) वाजला. याबरोबरच संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, हा निवडणूक कार्यक्रम अवघ्या २८ दिवसांतच उरकण्यात येणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेला मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीची मुदत अद्याप संपलेली नाही. त्यामुळे सोयगाव वगळता उर्वरित सहा नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम पूर्णतः धावपळीचा असल्यामुळे निवडणुकीचे कामकाज करणार्या कर्मचाऱ्यांना कुठलीही उसंत मिळणार नाही. त्यांना प्रशिक्षणही घाईघाईत घ्यावे लागणार आहे..

शिवाय २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ रोजी मतमोजणी असा कार्यक्रम असल्यामुळे यंत्रणेची धांदल उडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी वेगवेगळे कर्मचारी नेमावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. प्रभाग रचना, आरक्षण सोडत आधीच जाहीर झालेली आहे.

या ठिकाणी होणार निवडणूक

फुलब्री (नगरपंचायत) तर गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर या नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगर परिषद, पंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. न.प. कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू असली तरी अन्य इतर ठिकाणीही मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा करता येणार नाही. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना, मदतीला मात्र कोणतीही आडकाठी असणार नाही.

महानगरपालिकेतील प्रशासकराजचे काऊनडाऊन सुरू !

निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर लगबग : राजकीय वर्तुळात उत्सुकता

छत्रपती संभाजीनगर : मुकेश चौधरी

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर लगबग सुरू झाली असून, प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आता मतदार याद्यांच्या कामाला वेग आला असल्याने महापालिकेवर गेली सहा वर्षे सुरू असलेल्या प्रशासकराजचे काऊन डाऊन सुरू झाले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये व राजकीय वर्तुळातही उत्सुकता निर्माण झाली असून, शहरात पुन्हा एकदा लोकशाहीचा बिगुल वाजण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

२०१९ मध्ये महापालिकेची मुदत संपली. मात्र कोविडमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्द्यावरून सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल असल्याने निवडणुका लांबल्या. दरम्यान, प्रशासक म्हणून आयुक्तांकडे कारभार सोपवण्यात आला. या

कालावधीत अनेक महत्त्वाची विकासकामे गतिमान झाली. परंतु लोकप्रतिनिधी नसल्याने सामान्य नागरिकांचा सहभाग मर्यादित असल्याने लोकशाहीवर प्रशासकीयराजचा शिक्का लागल्याची चर्चा रंगत होती. मात्र न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य शासनाने निवडणूक आयोगाशी संपर्क साधून मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा, मतदारसंघ आरक्षण, प्रभाग रचना आणि निवडणूक कार्यक्रमाबाबत आंतरिक पातळीवर हालचाली सुरू आहेत. यामुळे डिसेंबर अखेर किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावरून शहरातील विकास, अडथळे आणि नागरिकांच्या अपेक्षा या साऱ्यांवर निर्णय देण्यासाठी शहर सज्ज होत असून, प्रशासकराजचा शेवट आणि लोकशाहीचा आरंभ अशी ही ऐतिहासिक घडी ठरणार आहे.

राजकीय पक्षांच्या रणनीतीला वेग

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी गटबांधणी, रणनीती आणि संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना वेग दिला आहे. काही ठिकाणी प्रचाराचे मवार्म-अपफ पोस्टर्सही दिसू लागले आहेत. मागील सहा वर्षांच्या प्रशासकीय कारभारावर मतदार काय निकाल देतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेट

मनपाची आरक्षण सोडत

११ ऐवजी १० नोव्हेंबरला विद्यापीठाचे नाट्यगृह निश्चित ; शुक्रवारी होणार रंगीत तालीम

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महापालिकेने ११ नोव्हेंबर रोजी सोडत घेण्याचे नियोजन केले होते, परंतु आता १० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात ही सोडत काढली जाणार आहे. तर त्याची रंगीत तालीम शुक्रवारी (दि.७) घेण्यात येणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शासन आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्या-त्या महापालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनेही आयोगाच्या सूच-नेनुसार प्रभाग रचना अंतिम करून त्याचा प्रस्ताव आयोगाला सादर केला. त्यानंतर सूचना हकरती घेण्यात आल्या. त्याचा अहवालही शासनाला सादर केला गेला. आता प्रभागनिहाय मतदार याद्यांचे काम सुरू असून, येत्या गुरुवारी या प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

महापालिकेच्या ११५ वॉर्डाची विभागणी २९ प्रभागांत केली आहे. त्यात चार वॉर्डाचे २८ प्रभाग, तर ३ वॉडाँचा एक प्रभाग असा समावेश आहे. आता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला जाईल. नोव्हेंबर महिन्यातच प्रभागनिहाय्य मतदार याद्या अंतिम केल्या जाणार आहेत. तर येत्या ८ नोव्हेंबरला आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सकाळी ११ वाजता विद्यापीठातील नाट्यगृहात ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे.

२० पथक तैनात

महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचे स्थळ निश्चित केले आहे. त्यासोबतच या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेसाठी विविध २० पथके तयार केली. त्यात सुमारे ६४ हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील प्रत्येकाकडे कामाचे वाटप करण्यात आले आहे.

सोडत पहिल्यांदाच विद्यापीठात

महापालिका निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत आतापर्यंत उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमदिरात घेण्यात येत होती. मात्र पहिल्यांदाच महापालिका ही सोडत विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित केली आहे.

सोडतीनंतर होणार चित्र स्पष्ट

महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे. महिलांचे ५० टक्के आरक्षण असल्याने प्रत्येक प्रभागात दोन वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित राहतील. त्यासोबतच एससी, एसटी प्रभागासाठीचे आरक्षण काढले जाणार आहेत. या आरक्षणावरच अनेक इच्छुकांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न निश्चित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT