छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराला डिसेंबरअखेरपासून २०० एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने कामाला गती दिली आहे.
मागील अडीच वर्षांत कंत्राटदार कंपनीने केवळ ३ जलकुंभांचे काम पूर्ण करून ते महापालिकेला दिले आहेत. परंतु आता वाढीव पाणी साठवण्यासाठी येत्या २० डिसेंबरपर्यंत नवे २७जलकुंभ दिले जाणार असून, यातील जवळपास सर्वच जलकुंभांचे इनलेट आऊटलेट पाईप बसविण्याचे व त्याच्या चाचणीचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फारोळ्यातील नव्या २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आणि एमजेपीला डिसेंबरपर्यंत नवीन जलयोजनेच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण करून शहरवासीयांना २०० एमएलडी पाणीप-रवठा सुरू करावा, असे आदेश दिले होते. दोन दिवसांपूर्वीच दिशा समितीच्या बैठकीत खासदार संदीपान भुमरे, डॉ. भागवत कराड यांनीही या कामाचा आढावा घेतला. त्यात २० डिसेंबरपर्यंत महापालिकेला २७ नवे जलकुंभ देण्यात येईल, असे एमजेपीकडून सांगण्यात आले.