छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या २०२६-२७या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज बुधवारी (दि. २५) स्थायी समितीसमोर सादर होणार असून, आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून त्याचे सादरीकरण केले जाणार आहे. या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण आधुनिकीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
सुमारे ३ हजार २०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्पात सिटी सेंट्रल पार्क, प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर, तसेच नागरिकाभिमुख सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला आहे.
महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या विकासकामांच्या प्रस्तावांचा आढावा घेऊन अर्थसंकल्पाचा आराखडा तयार केला आहे. हा अर्थसंकल्प आज बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. यात शहराच्या सर्वांगीण आधुनिकीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, यंदाचा अर्थसंकल्प ३ हजार २०० कोटींचा आहे.
या अर्थसंकल्पात शहरातील अतिक्रमणमुक्त केलेल्या विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्यांचे रुंदीकरण, वाढत्या वाहन संख्येच्या पार्श्वभूमीवर मल्टी लेव्हल पार्किंग प्रकल्प, पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, तसेच महापालिकेच्या वीज खर्चात बचत करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प यासारख्या योजनांसाठी मोठ्या निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
याशिवाय, पर्यटनवाढीसाठी डबलडेकर बस सुरू करण्याचाही विचार प्रशासनाने मांडला आहे. दरम्यान, हा अर्थसंकल्प आयुक्तांकडून सादर करण्यात आल्यानंतर स्थायी समिती यावर सखोल चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा सुचवू शकतात. त्यानंतर सुधारित प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
आणखी बदल होण्याची शक्यता
महापालिकेत नुकतेच निवडून आलेले नगरसेवक आपल्या प्रभागातील विकासकामांसाठी अतिरिक्त तरतुदींची मागणी करण्याची शक्यता असल्याने अर्थसंकल्पात आणखी बदल होण्याची शक्यता असून, त्यानंतरच अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.