छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar: चालत्या गाडीला अचानक आग; काही क्षणांत गाडी जळून खाक

बनोटी-सोयगाव रस्त्यावरील वरठाण गावाजवळील घटना; चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने जीव वाचला

पुढारी वृत्तसेवा

वरठाण : बनोटी-सोयगाव रस्त्यावर वरठाण गावाजवळ चालत्या गाडीला अचानक आग लागून काही क्षणांतच गाडी जळून खाक झाली. चालकाने प्रसंगावधान राखत चालत्या गाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेत चालक पंकज संजय भंगुरे (वय २५) किरकोळ जखमी झाले. मंगळवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

नाचनवेल येथून अशोक लेलंड कंपनीच्या ‘दोस्त’ गाडी क्रमांक ०१ डीआर १४२८ मधून टोमॅटोचे कॅरेट भरून पाचोरा (जि. जळगाव) येथे विक्रीसाठी नेण्यात आले होते. टोमॅटोची विक्री करून चालक भंगुरे हे पुन्हा नाचनवेलकडे टोमॅटो भरण्यासाठी जात होते. वरठाण गावाजवळील पेट्रोल पंपापासून काही अंतरावर गाडी आली असता अचानक गाडीतून धूर निघू लागला. काही क्षणांतच गाडीने पेट घेतला.

गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उडी मारली. त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला. दरम्यान, पेट्रोल पंपावरील कर्मचारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्याने ती आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच बनोटी दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार संदीप सुसर, नारायण खोडे व संजय सिंगल यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आग विझविण्यात आली. मात्र, तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. गाडीला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अंमलदार संदीप सुसर यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT