Gangapur Shillegon Murder Case  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime | आईनेच काढला मुलाचा काटा: खूनासाठी दिली जावयाला सुपारी; DNA तपासातून उलगडा

गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Gangapur Murder Case

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या एका थरारक खूनप्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येमागे मृताच्या आईचाच सहभाग असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.

२६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी एकभुर्जी वाघलगाव (शहानवाजपूर) शिवारातील कर्नावट यांच्या शेतातील विहिरीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. तो पांढऱ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळून त्याला दगड बांधून विहिरीत टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मृताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार तपासाला गती देण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण, फॉरेन्सिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू होते. सुरुवातीला बेपत्ता व्यक्तीची कोणतीही तक्रार नसल्याने तपास आव्हानात्मक ठरला. दरम्यान, एका व्यक्तीच्या बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली. संशयाच्या आधारे मृताच्या आईचे डीएनए नमुने घेऊन तपासणी करण्यात आली असता, मृतदेह तिच्याच मुलाचा असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुलाकडून त्रास होत असल्याच्या कारणावरून आईनेच त्याच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. तिने मुलाचा जिवलग मित्र गोरख शेकू आहिरे (रा. एकभुर्जी वाघलगाव) आणि स्वतःचा जावई कमलसिंग साहेबसिंग सिंगल (रा. टाकळीवाडी) यांना खून करण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी आर्थिक आमिषही दाखवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

२३ जानेवारी २०२६ रोजी आरोपींनी मयताला पोटुळ रेल्वे स्थानक परिसरात बोलावून त्याच्यावर हल्ला करून निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून दगड बांधून विहिरीत फेकण्यात आला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सलीम चाऊस आणि त्यांच्या पथकाने केली.

या घटनेमुळे शिल्लेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणात आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास शिल्लेगाव पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT