छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसंस्था : "आमच्या मतदार संघातील सिंचन विभागाच्या कामांचे कंत्राट माझ्याच माणसाला देण्यात यावे, दुसर्या कोणालाही दिले तर संबंधिताचे हातपाय तोडेल आणि अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही. अशा धमक्या पैठण, वैजापूर आणि गंगापूरचे आमदार अधिकाऱ्यांना देत आहेत," असा आरोप छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज (दि.१४) सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. शिवाय कामाचे १५ टक्के आपल्याच मिळावे, असाही दबाव ते अधिकाऱ्यांवर टाकत असल्याचे खा. जलील यांनी म्हटले आहे.
"पालकमंत्री भूमरे स्वतः अशा धमक्या देत आहेत. असाच प्रकार वैजापूर मध्येही सुरू असून या तालुक्यातील सिंचनाच्या कामासाठी ३५० कोटी निधी मंजूर झाला असल्याचे खा. जलील म्हणाले. या सर्व प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, येत्या १६ सप्टेंबरला मंत्रिमंडळ बैठक होत आहे. यात नेहमी प्रमाणे केवळ घोषणाच होऊ नये. प्रत्यक्षात कामे करण्याकडे देखील लक्ष द्यावे. आदर्श को ऑप. सोसायटीच्या घोटाळ्याविरोधात मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा नेण्यात येणार आहे. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावे, अशी मागणी केली जाणार असल्याचे जलील म्हणाले.
हेही वाचा :