छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा: शहरात सध्या गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक राहिलेला नाही. भररस्त्यात महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडणे, अडवून चाकूने भोसकणे आणि फसवणूक करून लुटण्याच्या घटनांमुळे शहरात स्ट्रीट क्राईमचा अक्षरशः भडका उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात सरासरी दररोज एका महिलेचे मंगळसूत्र चोरटे ओरबाडून नेत आहेत, मात्र पोलिसांना अद्याप एकही सराईत मंगळसूत्र चोर पकडण्यात यश आलेले नाही. शहरातील गुन्हेगार मोकाट फिरत असून, पोलिसांची कार्यप्रणाली पूर्णपणे फेल ठरल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन दिवसांत शहरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या भयंकर घटनांनी पोलिसांच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. रात्री आठ वाजले की रस्त्यांवरून पोलिस गायब होतात आणि त्यानंतर संपूर्ण शहर भुरट्या व सराईत गुन्हेगारांच्याच हवाली असते.
पोलिसांच्या नाकावर टिच्चून चेनस्नॅचिंग
शहरात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला असोत की रात्री कुटुंबासोबत दुचाकीवर फिरणाऱ्या महिला; चोरटे कुणालाही सोडत नाहीत. गेल्या काही महिन्यांत मंगळसूत्र चोरीच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे. सरासरी दररोज कुठल्या ना कुठल्या भागात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल होतो, पण पोलिसांच्या तपासाची पाटी कोरीच आहे. गुन्हेगार पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोऱ्या करत आहेत आणि पोलिस केवळ गुन्हे दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडत आहेत.
रात्री आठ वाजेनंतर पोलिस गायब !
शहरातील वाहतूक पोलिस असोत की स्थानिक पोलिस, रात्री ८ वाजेनंतर ते रस्त्यावरून जणू दिसेनासेच होतात. याच संधीचा गैरफायदा घेत चोरटे आणि भुरटे सक्रिय झाले आहेत. शहरात पोलिसांची नाकाबंदी आणि रात्रीची गस्त केवळ नावालाच उरली आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
हर्मूलला गावगुंडाचा पिस्तूल रोखून राडा
हसूल भागातील बिस्मिल्लानगर येथे बुधवारी (दि. १५) दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावगुंडाने राडा केला, गल्लीतील अनेक वाहनांच्या दगड मारून काचा फोडल्या. तरुणांसह एका नागरिकांवर थेट पिस्तूल काढून रोखले. घटनेची माहिती मिळताच हर्सल ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी पथकासह धाव घेतली. मात्र आरोपी पसार झाले होते. दरम्यान, अराफत पटेल असे संशयिताचे नाव असून, गतवर्षी त्याने असाच प्रकार केला होता. मात्र तेव्हा त्याच्याकडील पिस्तूल नकली निघाले होते. व्हिडिओ व्हायरल होताच तो पळून गेला असून, हसूल पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
थरार १ - अल्पवयीन लुटारूंचा उच्छाद; तरुणाच्या छातीत खुपसला चाकू
मंगळवारी (दि.१४) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एपीआय कॉर्नर भागातील मिंट हॉटेलसमोर गुन्हेगारीचा कळस गाठणारी घटना घडली. करण हा प्रोझोन मॉल येथील एका कपड्यांच्या शोरूममध्ये कामाला आहे. रात्री आठ वाजेच्या सुमारास काम संपवून तो त्याच्या एका मैत्रिणीसोबत बाहेर गेला होता. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तो घरी जाण्यासाठी एपीआय कॉर्नर येथील मिंट हॉटेलजवळ थांबला होता. याचवेळी एका दुचाकीवरून तिघे जण थोडे पुढे जाऊन करणला पाहून माघारी फिरून त्याच्याजवळ आले. पांढरा शर्ट घातलेल्या एकाने करणकडे पिण्यासाठी पाण्याची बाटली मागितली.
पाणी नसल्याचे सांगताच त्यांनी त्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. करणने गाडी सुरू करून पळण्याचा प्रयत्न केला असता, एकाने गाडीची चावी काढली आणि थेट करणवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या या अल्पवयीन गुंडांनी करणच्या छातीत चाकू खुपसला व त्याचा मोवाईल घेऊन पोबारा केला. चाकू छातीत अडकलेला असतानाही रक्तबंबाळ करण रस्त्यावर धावला. सुदैवाने समीर नावाच्या एका देवदूताने त्याला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन वायाळ करत आहेत.
थरार २ - धावत्या दुचाकीवरून ओरबाडले गंठण
सोमवारी (दि.१३) रात्री ९ वाजेच्या सुमारास वर्दळीच्या सेव्हनहिल चौकात सोनसाखळी चोरीचा थरार घडला. रामेश्वर नांगुर्डे (रा. सिंहगड कॉलनी) हे त्यांची पत्नी सोनाली आणि मुलीसोबत दुचाकीवरून घराकडे जात होते. सेव्हनहिल चौकात गाडीचा वेग कमी होताच, मागून विनाक्रमांकाच्या स्पोर्ट्स बाईकवर आलेल्या दोन चोरट्यांनी सोनाली यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण ओरबाडले. या झटापटीत सोनाली गाडीवरून पडून जखमी होता होता थोडक्यात बचावल्या. पतीने सिडको उड्नुणपुलापर्यंत पाठलाग करूनही भरधाव चोरटे गुंगारा देऊन पळून गेले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थरार ३ - मुलाचे पैसे आले म्हणत वृद्धेला लुटले
शिवाजीनगर भाजीमंडईत व्यवसाय करणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिला सरूबाई कांबळे यांनाही चोरट्यांनी लक्ष केले. मंगळवारी (दि.१४) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराने त्यांच्याजवळ येऊन तुमच्या मुलाची फाईल टाकलेली आहे, ३०-४० हजार रुपये आले आहेत. बैंक बंद होईल लवकर चला, अशी थाप मारली. घाबरलेल्या आजीला त्याने दुचाकीवर बसवून सूतगिरणी परिसरातील एका निर्जन इमारतीजवळ नेले. तिथे त्यांच्या गळ्यातील पोत व कानातले असा ३६ हजारांचा ऐवज हिसकावून त्यांना तिथेच सोडून पळ काढला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.