छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवर ओळख करून घेत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लनाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत विविध लॉज आणि कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून विशाल महेंद्र तुपे (रा. शताब्दीनगर) याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.१९) बलात्कार आणि 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन पीडिता शिक्षण घेत असून ती नक्षत्रवाडी भागात राहते. गेल्या वर्षी (२०२५ मध्ये) तिची इन्स्टाग्रामवर विशाल तुपे याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. याचा गैरफायदा घेत विशालने २९ मार्च २०२५ रोजी दुपारी पीडितेला टीव्ही सेंटर येथील गोल्डन लॉजवर नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर ५ मार्च २०२६ रोजी त्याने तिला औरंगपुरा येथे कॉफी पिण्याच्या बहाण्याने बोलावले.
कॅफे बंद असल्याने तिथे सुद्धा विशालने मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. त्याच्या छळाला कंटाळून अखेर अल्पवयीन पीडितेने गुरुवारी (दि. १८) सिडको ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.
आरोपी विशालने तिला हर्सल येथील अंबरहिल भागातील रूम, एन-१ सिडकोतील 'टॉयटेनिक जहाज कॅफे' आणि कॅनॉटमधील 'सपना मोमोज' अशा विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला, असे तक्रारीत नमूद आहे.
माझे वडील सर्व बघून घेतील, तुला काय करायचे ते कर...
१० मे २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तो टायटॅनिक जहाज कॅफे येथे भेटला असता, तिने पुन्हा लग्नाची मागणी केली. यावर विशालने तिला शिवीगाळ करत हाताचापटाने मारहाण केली. पीडितेने माझ्या आईला सर्व सांगेल, तुझी पोलिसांत तक्रार करेल, असे म्हणताच त्याने माझे वडील सर्व बघून घेतील, तुला काय करायचे ते कर', अशी धमकी दिली.