Student Canteen Collapse
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सव सुरू आहे. महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन कक्ष उभारण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे हा डोम रविवारी (दि.२८) पहाटे ३ च्या सुमारास कोसळला.
विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी प्र कुलगुरू निवासस्थान परिसरात हा डोम उभारण्यात आला आहे. शनिवारी (दि.२७) सायंकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. हा पाऊस रविवारी सकाळी ५ वाजेपर्यंत सुरूच होता. पावसाचे पाणी डोमवर साचले होते. त्यातच त्यावर झाडाची फांदी पडली. पाणी व झाडाच्या फांदीच्या ओझ्याने हा डोम पहाटे तीनच्या सुमारास कोसळला. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांचा राबता नव्हता. त्यामुळे कोणालाही इजा पोहचली नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांत चिंतेचे वातावरण पसरले होते.
पर्यायी व्यवस्था
दरम्यान रविवारी सकाळीच विद्यार्थ्यांच्या नाष्ठयासह जेवनाची पर्यायी व्यवस्था समोरच असलेल्या कला सादरीकरण विभागात करण्यात आली. दरम्यान रविवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था नाट्यगृह परिसरात पत्र्याचे शेड उभारून करण्यात आली आहे. सोमवारी केंदीय महोत्सवाचा सामारोप असल्याने भोजन व नाश्त्याची व्यवस्था नाट्यगृह परिसरातच करण्याचा निर्णय ऐनवेळी विद्यापीठ प्रशासनाने घेतला.