कन्नड: तालुक्यातील पळसखेडा येथे बुधवारी (दि. २०) सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरात झोपलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष लक्ष्मण काकडे (वय ६५) रा. पळसखेडा असे हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गावालगत पाण्याच्या टाकीजवळ सुभाष काकडे यांचे घर असून सध्या घरकुल मंजूर असल्याने घराचे काम सुरु असल्याने ते नवीन घरात बाजीवर झोपेलेले होते. त्यांच्यावर बिबट्याने अचानक नरड्यावर हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी मुलगा गणेश व ग्रामस्थ यांनी घराकडे धाव घेतली असता, सुभाष काकडे हे मृत अवस्थेत आढळून आले, अशी माहिती प्रथमदर्शनीय गावकऱ्यानी दिली. सुभाष काकडे हे अर्धांगवायूच्या झटका आल्याने त्रस्त होते त्यामुळे त्यांना प्रतिकार ही करता आला नाही.
या घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होवून हल्ला नेमका बिबट्यानेच केला की अन्य वन्यप्राण्याने याची कसून चौकशी करत आहे. सदर घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.