Chhatrapati Sambhajinagar Kannad spice powder seized 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Kannad spice powder seized : कन्नडमध्ये २.९६ लाखांचा मसाला पावडर साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर - ‘लाल हिना’ ब्रँडची मिरची व हळद पावडर ताब्यात; अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : शहरात ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने मेसर्स एस.एम. एजन्सी या अन्न विक्री प्रतिष्ठानावर २२ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. या कारवाईत ‘लाल हिना’ ब्रँडच्या मिरची पावडर व हळद पावडरचा एकूण ६२६ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत २ लाख ९६ हजार ३८० रुपये आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिष्ठानाची तपासणी केली असता, अन्न सुरक्षा मानके व नियमांच्या पालनात काही त्रुटी आढळून आल्या. यामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या मिरची पावडरची ५०० ग्रॅम वजनाची ८३६ पाकिटे (४१८ किलो), किंमत २ लाख १३ हजार १८० रुपये, तसेच हळद पावडरची ५०० ग्रॅम वजनाची ४१६ पाकिटे (२०८ किलो), किंमत ८३ हजार २०० रुपये, असा एकूण ६२६ किलो साठा जप्त करण्यात आला.

तपासणी अहवालानुसार, प्रतिष्ठानाला निर्धारित ५२ पैकी ४० गुण मिळाले. स्वच्छतेसाठी पुरेशी जागा नसणे, कामगारांची वार्षिक वैद्यकीय तपासणी न करणे आणि ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी व्यवस्था उपलब्ध नसणे, अशा त्रुटी तपासणीदरम्यान नोंदविण्यात आल्या.

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला संपूर्ण साठा सीलबंद करून पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ताब्यात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT