छत्रपती संभाजीनगर : चहाचे पैसे मागितल्यानंतर "तू मुझसे पैसे कसे मांगते हो, मैं निसम डॉन हुं," असे म्हणत हॉटेलचालकाच्या पोटाला चाकू लावून, फायटरने मारहाण करत खिशातून ३० हजारांची रोकड काढून घेत लुटणाऱ्याला सिटी चौक पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) बेड्या ठोकल्या. ही घटना शनिवारी (दि.२६) फाजलपुरा भागातील सोनूज कॅफे येथे घडली होती.
मीर वासिफ अली नकी अली ऊर्फ निसम (रा. एसटी कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
फिर्यादी शेख अब्दुल हुजेफ अब्दुल अली (२८, रा. फाजलपुरा) याचे चहाचे हॉटेल आहे. सकाळी आरोपी चहा घेण्यासाठी आला. त्याला चहा आणि डोनट मागितल्याने अब्दुलने दिले. काही वेळाने चहा आणि डोनटचे पैसे मागितले तेव्हा आरोपीने "मैं निसम डॉन हू, मुझसे तुम कैसे पैसे मांगते हो, तुमको समजता नहीं क्या"? असे म्हणून चाकू काढून अब्दुलच्या पोटाला लावला. "तुम्हारे पास जितने पैसे है, मुझे दे दो, नहीं तो जान से मार दूंगा" अशी धमकी दिली. खिशातून ३० हजारांची रोकड काढून घेत शिवीगाळ करून मारहाण करत तेथून पळून गेला होता. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, सहायक फौजदार मुनीर पठाण, जमादार राजेंद्र साळुंके, अंमलदार बबन इप्पर, आनंद वाहूळ, मनोहर त्रिभुवन यांनी अटक केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी वासिफ याची आई शिक्षिका तर वडील दुबईला असतात. तो आईकडे राहतो. कधी दुबईवारीही करतो. मात्र त्याला नशा करण्याची सवय लागल्याने तो बाहेरच फिरत राहतो. आई-वडिलांकडून पैसे घेऊन मौजमजा करतो. तो पदवीपर्यंत शिकलेला आहे. तो प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे.