Chhatrapati Sambhajinagar news
छत्रपती संभाजीनगर: इन्स्टाग्रामवरील मैत्री, पुढे प्रेमात रूपांतर आणि अखेर लग्न... पण एका विवाहितेचा हा प्रवास अत्यंत वेदनादायी ठरला आहे. लग्नानंतर नराधम पतीने पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांचे अश्लील व्हिडिओ तिच्या आई-वडील आणि बहिणीच्या व्हॉट्सॲपवर पाठवून बदनामी केल्याचा गंभीर प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी २४ वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमारे ७ ते ८ महिन्यांपूर्वी पीडित महिला आणि पतीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि याच दरम्यान तिचे अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केले.
गेल्या ११ ऑक्टोबर रोजी दोघांनी लाडगाव येथे हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह केला. मात्र, लग्नानंतर काही कारणास्तव ते वेगवेगळे राहत होते. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने पत्नीचे सिमकार्ड स्वतःकडे घेतले. त्यानंतर नराधम पतीची विकृती बाहेर आली. त्याने पत्नीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि लग्नाचे फोटो थेट तिच्या आई-वडील आणि बहिणीला पाठवून दिले.
या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला आरोपीने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी सुरुवातीला वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.