छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील एशियन हॉस्पिटलच्या नवजात अतिदक्षता विभागाला (एनआयसीयू) आग लागल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील मोठ्या रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेची तपासणी सुरू केली आहे. २०० ते ३०० किंवा त्यापेक्षा अधिक खाटांची क्षमता असलेल्या तसेच आयसीयू सुविधा असलेल्या रुग्णालयांच्या पाहणीत अनेक गंभीर दोष असल्याचे निदर्शनास आले.
काही रुग्णालयांमध्ये आयसीयूसाठी स्वतंत्र आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्गच उपलब्ध नसल्याचे आढळून आले. यासह बसवण्यात आलेली अग्निशमन यंत्रणाही कार्यरत नसल्याचेही समोर आले आहे. काही ठिकाणी रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर हलविण्यासाठी आवश्यक रॅम्पची सुविधाही नसल्याने शहरातील दहा मोठ्या हॉस्पिटलला मनपाने नोटीसा बजावली असल्याची माहिती मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
गेल्या आठवड्यात एशियन हॉस्पिटलमधील एनआयसीयू कक्षात अचानक आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलमधील नर्स आणि व्यवस्थापनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सुरू केली. त्यानंतर अग्निशमन पथकही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने गंभीर दखल घेत शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
या पाहणीसाठी उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख स्वप्नील सरदार, अग्निशमन विभागप्रमुख अशोक खांडेकर आणि आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये जाऊन अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेची सखोल पाहणी केली.
आयसीयू कक्षाची तपासणी करताना बहुतांश हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र इमर्जन्सी दरवाजा उपलब्ध नसल्याचे समोर आले. यावेळी स्ट्रक्चरल मेजर्सचीही पाहणी करण्यात आली. यात अग्निशमनाची साधने उपलब्ध असली, तरी काही ठिकाणी ती प्रत्यक्ष वापरासाठी कार्यान्वित नसल्याचे आढळून आले. तसेच आग किंवा अन्य आपत्कालीन प्रसंगी गंभीर रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आवश्यक रॅम्पचीही काही हॉस्पिटलमध्ये व्यवस्था नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
दरम्यान, आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आढळलेल्या त्रुटींची दुरुस्ती करण्याच्या सूचना देत अग्निशमन विभागाने शहरातील दहा नामांकित हॉस्पिटलला नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती अग्निशमन विभागप्रमुख अशोक खांडेकर यांनी दिली. तसेच तपासणीदरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली.
मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनाहीअसलेल्या आयसीयूमध्ये आपत्कालीन यंत्रणेबाबत पुरेशी माहिती नसल्याचे निदर्शनास आले. आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकाच तिचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर करता येणेही आवश्यक आहे. त्यामुळे या व्यवस्थेबाबत संबंधितांना आवश्यक माहिती असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले.
सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यावर भर
आयसीयू हा रुग्णालयातील अतिसंवेदनशील विभाग असल्याने आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र मार्ग, कार्यरत अग्निशमन यंत्रणा, रॅम्प तसेच प्रशिक्षित कर्मचारी असणे आवश्यक आहे. आढळलेल्या त्रुटींची तातडीने पूर्तता करून आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अग्निशमन विभागप्रमुख अशोक खंडेकर यांनी दिली.
या हॉस्पिटलचा समावेश
महापालिकेने बजावलेल्या नोटिसांमध्ये युनाइटेड सिग्मा हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल, अपेक्स हॉस्पिटल, कमलनयन बजाज हॉस्पिटल, एशियन हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल आणि बेंबडे हॉस्पिटल यांच्यासह अन्य दोन नामांकित रुग्णालयांचा समावेश असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.