Honey Trap Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Honey Trap : 'पुलाव'च्या बहाण्याने बोलावून एमआरला अडकवले 'हनी ट्रॅप'मध्ये !

व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अपहरण; महिलेला अटक

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कामात मदत करण्याच्या बहाण्याने ओळख वाढवून एका महिलेने मेडिकल रिप्रेझेंटिव्हला 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून लुटल्याचा प्रकार आलोक नगर परिसरात घडला. मुलांसाठी पुलाव आणण्याच्या बहाण्याने रात्री बोलावून घेत महिलेच्या दोन साथीदारांनी त्याचे अपहरण केले. व्हिडिओ व्हायरलची धमकी देत मारहाण करून त्याच्याकडून एटीएमद्वारे रोकड काढून घेत दुचाकी व मोबाईल लुटून नेला. हा प्रकार शनिवारी (दि. २१) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपाली (३५, रा. सातारा परिसर) असे अटकेतील आरोपी महिलेचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. तर तिच्या फरार साथीदारांचा शोध सुरु आहे.फिर्यादी ४० वर्षीय मेडिकल रिप्रेसेन्टीव्ह हा बायजीपुरा भागात पत्नी व दोन मुलांसह राहतो.

१५-२० दिवसांपूर्वी फार्मसीमध्ये एका तरुणाने त्याला दीपालीचा मोबाईल नंबर दिला. तिने कामात मदत करण्याऐवजी पैशांची मागणी सुरू केल्याने फिर्यादी तिला टाळत होता. शनिवारी सायंकाळी ७ वाजता तिने फोन करून भेटण्यासाठी बोलावले. तेव्हा फिर्यादीने वेळ नसल्याचे सांगितले. तिने मुलांसाठी पुलाव घेऊन येण्याची विनंती केली.

रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी पुलाव घेऊन आलोक नगर येथील मोरल किड्स शाळेजवळ पोहोचले. दीपालीकडे पार्सल दिले तेव्हा तिने पार्सल घरी ठेवून थोडे बोलायचे आहे असे म्हणत त्याच्या दुचाकीवर बसली. पन्नास मीटर पुढे जाताच दोन अनोळखी इसमांनी गाडी अडवून तू या लेडीजला घेऊन कुठे चालला असे म्हणत मारहाण सुरू केली.

दीपालीला घरी जाण्यास सांगून फिर्यादीचे त्याच्याच दुचाकीवरून अपहरण केले. बीड बायपासमार्गे अंधारात नेऊन बेदम मारहाण करत व्हिडिओ व्हायरलची धमकी दिली. देवळाई चौकातील एटीएममधून साडेतीन हजार रुपये काढून घेतले आणि शिवाजीनगर चौकात सोडून दुचाकी व मोबाईल घेऊन पसार झाले. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT