Saptkund Waterfall Flooding
फर्दापूर: सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी व फर्दापूर परिसराला रविवारी रात्रीपासून आज (दि.२२) सकाळपर्यंत अविरत पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे वाघुर नदीसह परिसरातील सर्वच लहान-मोठ्या नद्या, नाले व ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. अजिंठा लेणीतील सुप्रसिद्ध सप्तकुंड धबधबा रौद्र रूपात कोसळत आहे. धबधब्याचा प्रचंड आवाज व जलप्रवाह पाहून निसर्गाचा प्रकोप स्पष्टपणे जाणवतो आहे.
या अचानक आलेल्या पावसामुळे वाघुर नदीच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरले असून, शेतकऱ्यांच्या कापूस, मका व मोसंबी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी नुकसानीचा अधिकृत अंदाज आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.
दरम्यान, सोमवारी अजिंठा लेणी पर्यटकांसाठी बंद असल्याने अनेक पर्यटक सप्तकुंड धबधब्याच्या अप्रतिम दृश्याचा अनुभव घेण्यापासून वंचित राहिले. निसर्गसौंदर्य आणि आपत्तीचा हा दुहेरी चेहरा अजिंठा परिसरात सध्या पाहायला मिळत असून, पर्यटक व स्थानिक नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.