जाहेद ऊर्फ पतलू जावेद शहा pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar crime : घरफोड्या करणारा सराईत 'पतलू' जेरबंद

हसूल, बेगमपुऱ्यात आठ दिवसांत तीन घरांवर डल्ला; २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : हद्दपार असताना हसूल आणि बेगमपुरा भागात दिवसा बंद घरांचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जाहेद ऊर्फ पतलू जावेद शहा (२०, रा. रमाईनगर, हसूल) असे आरोपीचे नाव आहे.

बेगमपुरा आणि हसूल पोलिसांच्या विशेष पथकाने संयुक्तपणे कारवाई करत शहागंज भागातून त्याला ताब्यात घेतले. त्याने ३ घरफोड्या केल्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहितीनुसार, गुरुवारी (दि. २३) दुपारी एन-१३ हडको येथील वानखेडेनगरमध्ये घरफोडीची घटना घडली. त्यानंतर बेगमपुरा आणि हर्सल पोलिसांच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रेकॉर्डवरील आरोपी जाहेद ऊर्फ पतलू यानेच घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्याला शहागंज परिसरातून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. ही कारवाई बेगमपुरा ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव आणि हसूलच्या निरीक्षक स्वाती केदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मदेवाड, रवी कांगणे, सहायक फौजदार शेवाळे, अंमलदार सोर, तडवी, जायभाये आणि सिंगल यांच्या पथकाने केली. आरोपी पतलूकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

घरफोडीच्या पैशातून जुगार, नशापाणी

आरोपी जाहेद ऊर्फ पतलू हा सराईत असून, त्याच्याविरुद्ध हर्मूल ठाण्यात यापूर्वी ४ गुन्हे दाखल आहेत. त्याला जुगार आणि बटनच्या नशेचे व्यसन आहे. डिसेंबर २०२५ मध्येच त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. तरीही तो शहरात राहून घरफोड्या करत असल्याचे समोर आले. चोरलेले दागिने त्याने एका सराफ्याला विक्री केले आहे.

'या' तीन घरफोड्यांचा झाला पर्दाफाश

  1. वानखेडेनगर (एन-१३ हडको): फिर्यादी मदनदास वैष्णव हे २३ जुलै रोजी दुपारी १२ ते १.१० वाजेदरम्यान बाहेर गेले असता आरोपीने बंद घराचे लॉक तोडून २ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. (बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल).

  2. कुटुंबासह हरसिध्दी लॉन्सवर फिरायला राधास्वामी कॉलनी (जटवाडा रोड, हर्मूल) : फिर्यादी भागीनाथ राठोड हे १६ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान गेले होते. या एक तासाच्या अवधीत आरोपीने दरवाजा उघडून शोकेसमधील १ ग्रॅम सोने अन् १५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि १० हजारांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला होता (हसूल ठाण्यात गुन्हा दाखल).

  3. हितोपदेश हाऊसिंग सोसायटी (जटवाडा रोड, हर्सल) : फिर्यादी राहुल ठोंबरे हे २० ते २२ जुलैदरम्यान सासुरवाडीला गेले होते. या कालावधीत आरोपीने वॉलकंपाऊंडचे गेट उघडून व घराचे कुलूप तोडून कपाटातील आईची २५ वर्षे जुनी सोन्याची एकदाणी, नथ, अंगठ्या, चांदीच्या चेन, लहान मुलांच्या पाटल्या, ब्रेसलेट असे १ तोळा सोने अन् ११० ग्रॅम चांदीचे दागिने आणि २ हजारांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला होता. (हसूल ठाण्यात गुन्हा दाखल).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT