छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी नियमितीकरणासाठी खुल्या भूखंडांच्या बेटरमेंट शुल्कात मिळणारी ५० टक्के सवलत आज मंगळवारी (दि. १५) संपत असल्याने गणेश चतुर्थीच्या सुटीतही महापालिकेच्या मुख्यालयात मालमत्ताधारकांची झुंबड उडाली.
सवलतीचा लाभ घेण्यासाठी सोमवारी दिवसभर गुंठेवारी कक्षात ३५० ते ४०० चलनांचे वाटप झाले. त्यानंतर लेखा विभागात सायंकाळी सहा वाजेपर्यंत २०५ मालमत्ताधारकांनी पैसे भरले असून तब्बल २ कोटी ३२ लाख रुपयांचे शुल्क जमा झाले.
महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरणासाठी जाहीर केलेल्या सवलतींमुळे गेल्या काही काळापासून मालमत्ताधारकांचा प्रतिसाद वाढला आहे. खुल्या भूखंडांसाठी बेटरमेंट शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. घरांसाठी बेटरमेंट शुल्क माफ करण्याबरोबरच अॅन्सलरी आणि साइड मार्जिनमध्ये २० टक्के सवलत देण्यात आली आहे.
महापौर समीर राजूरकर यांच्या पुढाकाराने घेतलेल्या या निर्णयामुळे मागील दोन महिन्यांत गुंठेवारीच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत २७ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. गणेश चतुर्थीची सार्वजनिक सुटी असतानाही आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने गुंठेवारी कक्ष आणि लेखा विभागाचे कामकाज सुरू ठेवण्यात आले. सकाळी दहा वाजता कक्ष सुरू होताच चलन घेण्यासाठी टप्पा क्रमांक तीनच्या प्रशासकीय इमारतीत नागरिकांच्या रांगा लागल्या. चलन वितरणासाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आली होती.
दिवसभरात सातही चलन बुक संपल्याची माहिती गुंठेवारी कक्षाचे समन्वयक जी. व्ही. भांगे यांनी दिली. दरम्यान, चलन मिळाल्यानंतर मालमत्ताधारकांनी शुल्क भरण्यासाठी लेखा विभागाकडे धाव घेतली. तेथेही मोठ्या रांगा लागल्या होत्या.
शनिवारीही १ कोटी ७९ लाखांचा भरणा
सध्या गुंठेवारी प्रस्ताव दाखल करण्यासाठी महापालिकेत मोठी गर्दी होत असून शनिवारी (दि.१२) सुटीच्या दिवशीही गुंठेवारी कक्ष सुरू ठेवण्यात आला होता. त्या दिवशी २८० संचिका प्राप्त झाल्या आणि १ कोटी ७९ लाख रुपये शुल्क जमा झाले. दरम्यान, १५ सप्टेंबरनंतर खुल्या भूखंडांसाठी बेटरमेंट शुल्क ७५ टक्के आकारले जाणार आहे. त्यामुळे सवलतीची मुदत संपण्यापूर्वीच शुल्क भरून घेण्यासाठी मालमत्ताधारकांनी शेवटच्या दिवशी महापालिकेत मोठी गर्दी केली.