छत्रपती संभाजीनगर : नातवाच्या शाळेतील अॅडमिशनसाठी गेलेल्या एका ५० वर्षीय आजीला शिवीगाळ करत मारहाण करून थेट घराबाहेर हाकलून दिले. या मारहाणीत आणि धक्काबुक्कीत आजी पायरीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना सोमवारी (दि.७) चौधरी कॉलनी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशीबाई संजू चौधरी, सुभद्राबाई चौधरी, संतोष चौधरी आणि अमोल कोल्हे (सर्व रा. चौधरी कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी गोदावरी नारायण चव्हाण (५०, रा. चौधरी कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, त्या सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी चौधरी कॉलनीत गेल्या होत्या. त्यावेळी शाळेतील मुख्याध्यापकांनी नातवाच्या अॅडमिशन संदर्भात त्यांना काशीबाई चौधरी यांच्याकडे जाण्यास सांगितले.
मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून गोदावरी या काशीबाई यांच्याकडे गेल्या. तिथे गेल्यानंतर काशीबाई आणि सुभद्राबाई यांनी त्यांना 'तुझ्या नातवाला इथून घेऊन जा' असे म्हणत शिवीगाळ सुरू केली आणि हाताचापटाने मारहाण केली. याचवेळी तिथे असलेल्या संतोष चौधरी आणि अमोल कोल्हे यांनी गोदावरी यांना धक्का देऊन घराबाहेर हाकलून दिले.
या धक्काबुक्कीत गोदावरी या घराबाहेरील पायरीवर पडल्या आणि त्यांच्या डोक्याला मार लागला. त्या जखमी अवस्थेत तेथून निघून जात असताना आरोपींनी 'तुझ्या घरी येऊन तुला मारू' अशी धमकीही दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार सोनवणे करत आहेत.
अॅडमिशनच्या कारणावरून वाद
नातवाच्या शाळेतील अॅडमिशनसाठी गेलेल्या आजीला आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. धक्काबुक्कीत त्या पायरीवरून पडून जखमी झाल्या. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.