कन्नड; पुढारी वृत्तसेवा : शहरात पिशोर नाका येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने पिशोर नाका येथे तीन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. मात्र मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा वेळ देऊनही राज्य सरकार मराठा समाजाला नुसते खोटेनाटे सांगून मराठा समाजाला झुलवत ठेवत असल्याने संतप्त झालेल्या शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि. २७) चार वाजता राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढुन अंत्यविधी करुन राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. हि प्रतिकात्मक अंत्ययात्रा पिशोर नाका येथुन काढत हिवरखेडा येथील चौकात नेण्यात आली. तेथुन पुन्हा ती अंत्ययात्रा पिशोर नाक्यावर आणत पिशोर रोडवरिल बीएसएनएलच्या कार्यालयापर्यंत नेत पुन्हा आंदोलन स्थळी ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणली. आणि हिंदु रुढीपरंपरेनुसार पिशोर नाक्यावरील बाळासाहेब पवार चौकात ह्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी शहरातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.
सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आंतरवली सराटी या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कन्नड तालुक्यातील औराळा, चापानेर, तांडपिपळगाव या सर्कलच्या सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला गुरुवार, शुक्रवार पासुन सुरुवात करण्यात आली. चापानेर सर्कलच्या या साखळी उपोषणाला बसस्थानकावर मंडप टाकुन सुरुवात करण्यात आली आहे. यात चापानेर, जळगाव घाट, आठेगाव, खेडा, चिंचखेडा, जवळी, हसनखेडा, सिरजापुर, सिरजगाव, बोलटेक या गावातील तर तांडपिपळगाव सर्कलमधील बोरसर (बु) येथे सुरु करण्यात आलेल्या उपोषणाला बोरसर खुर्द, बोरसर बुद्रुक, लव्हाळी, टाकळी, वैसपुर, केसापूर, अंतापुर या गावातील तर औराळा सर्कलमधील औराळा, औराळी, धनगरवाडी, हिंगणा, खामगाव, सहानगाव, रोहिला, कानडगाव, विटा, जवळी (खुर्द) जवळी (बु) पळसखेडा, हसनखेडा, कविटखेडा, गव्हाली, शेरोडी, बिबखेडा, चिंचखेडा, निपाणी या गावातील मराठा बांधव उपोषणाला बसुन जरांगे पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा देता आहे. चापानेर येथे जोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू तोपर्यंत रात्री दररोज उपोषण स्थळी भजन, किर्तन, प्रवचन, भारुड, व्याख्यान हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही सर्कलमधील साखळी उपोषणाला दररोज एका गावातील मराठा बांधव बसणार आहे.