Marathwada rain Chhatrapati Sambhajinagar flood news
छ. संभाजीनगर जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने वैजापूर शहरासह तालुक्यात मोठे नुकसान केले आहे. शहरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, १०० कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. नगरपालिकेने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.
सध्या नारंगी धरणातून १६०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वरच्या भागात पाऊस जास्त असल्याने तसेच पुढील तीन तासांत वैजापूर परिसरात २३ मि.मी. पावसाचा अंदाज आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
वैजापूर तालुक्यातील भिवगाव, नारायणगावसह इतर ८ गावांना पुराचा मोठा विळखा बसला आहे. अनेक लोक वाड्या-वस्त्यांवर अडकले आहेत. या भयंकर परिस्थितीत म्हशी आणि इतर जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या वतीने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी एनडीआरएफ टीम पोहोचू शकत नसल्याने, आमदार रमेश बोरणारे यांनी मदतीसाठी हेलिकॉप्टर मागवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
वैजापूर शहरात अनेकांची घरे वाहून गेल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार रमेश बोरणारे यांनी एका पीडित महिलेचा थेट संपर्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करून दिला. उपमुख्यमंत्र्यांनी त्या पीडित मुलीला थेट मदतीची ग्वाही दिली असून, "घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे" असे भावनिक सांत्वनही त्यांनी यावेळी केले.