बिडकीन : शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा शेजाऱ्याने पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील लाखेगाव शिवारात ४ एप्रिलच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी शेजारील शेतकऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमील उमर शेख (वय २८, रा. लाखेगाव) हे आपल्या गट क्रमांक ४२ मधील कांदा पिकाला पाणी भरण्यासाठी शेतात गेले होते. सध्या रात्रीचा विद्युत पुरवठा असल्याने ते नेहमीप्रमाणे पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र, शेजारील गट क्रमांक ६ चे शेतकरी प्रताप भोपळावत यांनी डुकरांचा उपद्रव रोखण्यासाठी शेताच्या बांधावर उघड्या तारा लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. पाणी भरत असताना या तारांचा संपर्क पाण्यात आल्याने जमील शेख यांना जोरदार विद्युत धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पहाटेपर्यंत जमील घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. फोनची रिंग वाजत होती, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने शोध घेतला असता जमील यांचा मृतदेह शेतात आढळून आला. ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. बिडकीन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जोपर्यंत या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आणि पुराव्यांच्या आधारे संशयित प्रताप भोपळावत याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात जमील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत जमील शेख यांच्या पश्चात पत्नी आणि तीन अपत्ये असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार उबाळे आणि जमादार शेकडे करत आहेत.