छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केल्यानंतर त्याचे अधिकृत जीएसटी बिल मागितल्याच्या कारणावरून एका ७३ वर्षीय माजी सैनिकाला मारहाण करत, छातीवर लाथ मारून व गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना छावणी परिसरात घडली होती. छावणी पोलिसांनी सुरुवातीला केवळ अदखलपात्र नोंद केली. अखेर या वयोवृद्ध माजी सैनिकाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार छावणी पोलिस ठाण्यात तुलसी इलेक्ट्रॉनिक्सच्या दोन व्यापारी बंधूंविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी सोमवारी (दि. १९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहनिश राम मदनानी (२६) आणि नवनीत राम मदनानी (२६) अशी आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात गड्डीगुडम, छावणी येथील ७३ वर्षीय निवृत्त माजी सैनिक मिर्झा आझम सालार बेग यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, दैनंदिन वापराचे विजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी छावणीतील तुलसी इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर गेले होते. खरेदी केलेल्या साहित्याचे ६ हजार ६२० रुपये त्यांनी दुकानदाराला रोख अदा केले आणि अधिकृत जीएसटी बिलाची मागणी केली.
यावर दुकानदार नवनीत मदनानी याने, बिल भेटणार नाही, सामान घ्यायचे तर घ्या, नाहीतर इथून निघून जा अशी भाषा वापरली. ग्राहकाला बिल न देता सरकारची फसवणूक का करता? बिल नसेल तर सामानाची हमी कशी समजायची? असा सवाल माजी सैनिकांनी करताच नवनीतने त्यांना शिवीगाळ करत कानशिलात लगावली. नवनीत याने त्यांच्या डोक्यावर, कपाळावर आणि खांद्यावर मारले. शर्ट फाडून मारहाण केली आणि दोन्ही हातांनी गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
नागरिकांनी मध्यस्थी करून त्याला बाजूला ओढले. त्यानंतर नवनीतने लगतच्या दुकानातून मोहनिशला आवाज दिला, आज याला मारून टाकू, इकडे ये अशी चिथावणी देऊन बोलावून घेतले. मोहनिशने येऊन माजी सैनिकाच्या डाव्या छातीवर जोरदार लाथ मारली, ज्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांच्या छातीवर बसून त्यानेही दोन्ही हातांनी त्यांचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
ते हृदयविकाराचे रुग्ण असून त्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे. स्थानिक व्यापारी असल्याने आरोपींना त्यांच्या या आजाराची पूर्ण कल्पना होती. हे माहीत असतानाही आरोपींनी त्यांच्या छातीवर लाथ मारून हल्ला चढवला. तसेच, तुला पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकू, अशी धमकी दिली. नागरिकांनी आरोपींना दूर केल्याने माजी सैनिकाचा जीव वाचला.
स्मार्ट सिटी सीसीटीव्हीत थरार कैद
हल्ल्यानंतर जखमी माजी सैनिकांनी छावणी पोलिस ठाणे गाठले होते. घाटीत तपासणी झाल्यानंतर पोलिसांनी केवळ एनसी नोंदवून घेतली होती. आरोपी मात्र पोलिस आणि कोर्ट आमच्या खिशात आहेत, अशा धमक्या देत असल्याने अखेर त्यांनी न्यायालयात दाद मागितली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी विवेक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गीता हाके करत आहेत.