छत्रपती संभाजीनगर : शहर विकास आराखड्यातील (ईपी) शासनाने मंजूर करून त्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. मात्र, गॅझेट प्रसिद्ध होऊन अडीच महिने उलटूनही ईपीचे नकाशे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे रस्ते रुंदीकरण, गुंठेवारी प्रक्रिया आणि बदललेल्या आरक्षणांबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असून, ईपीचे नकाशे कधी उपलब्ध होणार, यासाठी नागरिकांना नगर रचना विभागाच्या खेट्या मारव्या लागत आहेत.
शहर विकास आराखड्याला शासनाने १५ एप्रिल २०२५ रोजी मंजुरी दिली होती. आराखड्यातील काही भागांमध्ये बदल व सुधारणा सुचवून हा आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर १४ मे २०२६ रोजी ईपीला मंजुरी देण्यात आली. १५ मे रोजी त्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. तसेच, त्याआधारे सुधारित नकाशे तयार करून शासनाकडे सादर करण्याचे आदेश नगर रचना विभागाला देण्यात आले होते.
मात्र, त्यानंतर अडीच महिने उलटूनही नकाशे उपलब्ध न झाल्याने नागरिकांची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुंठेवारी शुल्कात सवलतीचा निर्णय जाहीर करण्यात आला.
भूखंडांच्या गुंठेवारीसाठी बेटरमेंट शुल्कात १५ सप्टेंबरपर्यंत ५० टक्के, तर त्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत २५ टक्के सवलत देण्यात आली आहे. बांधकाम केलेल्या घरांसाठी बेटरमेंट शुल्क शंभर टक्के माफ करण्यात आले आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत. मात्र ईपीचे नकाशे उपलब्ध नसल्याने गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
१५ जुलैलाच नकाशे शासनाकडे
यासंदर्भात नगर रचना विभागाकडे चौकशी केली असता, शासनाकडून ईपीचे नकाशे अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. नगर रचना विभागातील अधिकारी याबाबत सहाय्यक संचालक व सहसंचालक कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत. दरम्यान, ईपीचे नकाशे १५ जुलैपर्यंत तयार करून शासनाकडे सादर करण्यात आले असून, विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या आठवडाभरात हे नकाशे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.