छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महामार्गालगत असणाऱ्या व्यावसायिक अतिक्रमणांवर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ (धुळे-सोलापूर) तसेच राष्ट्रीय महामार्ग ७५२ (छत्रपती संभाजीनगर ते पैठण) लगत असणारी अतिक्रमणे शनिवारी (दि. ५) पासून हटवण्यास सुरुवात झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत ही मोहीम राबवली जात असून आतापर्यंत ४७० पक्की दुकाने व ढाबे, तसेच २५५ कच्ची शेड, टपऱ्या आणि व्यावसायिक फलक (बोर्ड) हटवण्यात आले आहेत. सर्व विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जात आहे. सोमवारी धुळे-सोलापूर महामार्गावरील गांधेली, सातारा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी इत्यादी भागांत ही मोहीम राबवली जाणार आहे. ही कारवाई पुढील १५ दिवस कन्नड तसेच पैठणपर्यंत सलग सुरू राहील, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने दिली आहे.
दरम्यान, महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, यासाठी नागरिक आणि व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.