छत्रपती संभाजीनगर : लग्नाच्या मागणीला तरुणीच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने तब्बल १५ हून अधिक बनावट इन्स्टाग्राम खाती उघडून तरुणीची आणि तिच्या कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपीने तरुणीच्या नातेवाइकांनाही टॅग करून अश्लील आणि शिवराळ भाषेतील मेसेज पाठवले. हा प्रकार मार्च ते ऑगस्ट या दरम्यान घडला. सिटी चौक पोलिस ठाण्यात आयटी ॲक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित अंकुश चव्हाण (३५, रा. मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी तरुणी आणि आरोपी रोहित हे दोन वर्षांपूर्वी पुण्यातील एका कंपनीत एकत्र काम करत होते. कामाच्या निमित्ताने त्यांच्यात ओळख झाली होती. नंतर काही कारणास्तव रोहितला कंपनीतून काढून टाकण्यात आले.
दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी रोहितने तरुणीला भेटून तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. तथापि, रोहितचे वर्तन आणि बोलण्याची पद्धत न आवडल्याने तिच्या वडिलांनी त्याला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. या रागातून त्याने बनावट इन्स्टाग्राम खाती उघडून त्याद्वारे संबंधित तरुणीला बदनाम केल्याचा आरोप आहे.