वैजापूर : तालुक्यातील चिंचडगाव येथे एका महिला कीर्तनकाराच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असतानाच, गावात पुन्हा दोन ठिकाणी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन दिवसांत घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी, चिंचडगाव येथील एका आश्रमात अज्ञात हल्लेखोरांनी घुसून एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या केली होती. आश्रमातील दानपेटीही लंपास करण्यात आल्याने, ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला होता.
या हत्येचा तपास सुरू असतानाच, मध्यरात्री गावात आणखी दोन ठिकाणी चोऱ्या झाल्याच्या घटनांनी ग्रामस्थांची झोप उडवली आहे. एकापाठोपाठ घडणाऱ्या या गुन्हेगारी घटनांमुळे "चिंचडगावात चाललंय तरी काय?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. गावात सध्या दहशतीचे वातावरण असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करून गावातील कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.