छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री एका तरुणावर अत्यंत क्रूर आणि अमानुष हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी एका 32 वर्षीय तरुणाला निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले असून, यामध्ये त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीताराम आळंजकर (वय 32) हा शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिंदेवाडी फाट्यावरून जात होता. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याला रस्त्यालगत असलेल्या एका शाळेजवळून बळजबरीने उचलले आणि जवळच असलेल्या एका निर्जन शेतात नेले. त्याठिकाणी हल्लेखोरांनी सीताराम याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, हल्लेखोरांनी सीताराम याच्या गुप्तांगावर वार करून त्याला गंभीर जखमी केले.
हल्ला केल्यानंतर आरोपींनी जखमी सीताराम याला पुन्हा रस्त्यावर आणून टाकले आणि तिथून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत सीताराम बराच वेळ तिथेच मदतीसाठी विव्हळत पडून होता. घटनेची माहिती मिळताच त्याचे चुलत भाऊ लक्ष्मण आळंजकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रात्री साडेआठच्या सुमारास गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.