Kunal Chandgude Case Update
छत्रपती संभाजीनगर : एका क्षणाच्या रागातून आणि कौटुंबिक नैराश्यातून खवड्या डोंगरावर घडलेल्या चांदगुडे कुटुंबाच्या सामूहिक मृत्यूच्या घटनेने अवघे शहर सुन्न झाले आहे. १८ वर्षीय कुणाल, त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता या तिघांचाही एकाच वेळी करुण अंत झाला. संपूर्ण कुटुंबच संपल्यामुळे, टोकाचे पाऊल उचलण्याइतका त्यांच्यात नेमका काय कौटुंबिक वाद होता, याचे उत्तर आता कायमचे अनुत्तरित राहण्याची चिन्हे आहेत. तिघेही हयात नसल्याने पोलिसांचा तपास आता केवळ 'अकस्मात मृत्यू'च्या नोंदीपुरताच मर्यादित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांमध्ये जुन्या घटनांचे संदर्भदेऊन आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. मृत्यूच्या सहा दिवसांपूर्वी संगीता यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून नणंदांवर गंभीर आरोप केले होते. यावर मुरलीधर यांच्या बहिणीने मुरलीधर यांना घराबाहेर काढल्याचा दावा केला. दुसरीकडे, संगीता यांच्या बहिणीने सासरच्या आरोपांवर संताप व्यक्त करत उलट सवाल उपस्थित केले आहेत.
दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलिसांनी धनगर पिंपळगाव येथे जाऊन मुरलीधर यांच्या आई-वडिलांसह तीन बहिणींचे जबाब नोंदवले. त्यांनी कौटुंबिक वाद नसल्याचे सांगत कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.
संगीता यांच्या माहेरच्यांचे जबाब घेणे अद्याप बाकी असून, या सामूहिक मृत्यूमागचे मूळ कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या नव्या व्हिडिओमुळे संगीता यांनी खाली उडी मारली की? खाली पाहताना त्यांचा पाय घसरून तोल गेला, याबाबत नवा संशय आणि चर्चा सुरू झाली आहे.